- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- राज्यातील पर्यटनाला गती देणार! पर्यटन मंत्री मा. ना. शंभूराज देसाईंची ग्वाही
राज्यातील पर्यटनाला गती देणार! पर्यटन मंत्री मा. ना. शंभूराज देसाईंची ग्वाही
पर्यटन विभागाची आढावा बैठक मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री मा. ना. शंभूराज देसाई यांनी मंत्रालयातील त्यांच्या दालनात पर्यटन विभागाची आढावा बैठक घेतली. राज्यातील पर्यटनाला गती देण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास व पर्यटन उपक्रमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. त्याचबरोबर आगामी शंभर दिवसांत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांवर भर द्यावा, असे निर्देश मा. ना. शंभूराज देसाई यांनी याप्रसंगी दिले. तसेच देशातंर्गत व आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्यातील पर्यटन वाढावे यासाठी गाव ते राज्यस्तरापर्यंत जिथे पर्यटनस्थळांचा विकास केला जात आहे त्याची प्रत्येक जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती मागवून पर्यटन विकासासाठी सर्वसमावेशक धोरण राबवण्याच्या अनुषंगाने मा. ना. शंभूराज देसाई यांनी यावेळी सूचना दिल्या. नवीन पर्यटन धोरण, पर्यटन संचालनालयाकडे वर्ग करण्यात आलेली कामे, पर्यटन स्थळांची वर्गवारी, प्रसिद्धी उपक्रम, कृषी पर्यटन धोरण, साहसी पर्यटन धोरण, कॅरॅव्हॅन धोरण, बीच शॅक धोरण इत्यादी धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत यावेळी त्यांनी निर्देश दिले. पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत हे लक्षात घेऊन पर्यटन वाढीसाठी पर्यटन धोरण-२०२४ ची प्रभावी अंमलबजावणी करणे, तसेच पर्यटन संचालनालयामार्फत सुरू असलेले उपक्रम, प्रादेशिक पर्यटन विकास आराखडे, केंद्र शासनाच्या मदतीने सुरू असलेले प्रकल्प यांना गती देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याबाबत मा. ना. शंभूराज देसाई यांनी यावेळी सूचना दिल्या.
या बैठकीला पर्यटन सचिव जयश्री भोज, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशी यांच्यासह विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.