- Hindi News
- राष्ट्र
- चीनमध्ये एचएमपीव्ही उद्रेक देशात सतर्क तेचा इशारा
चीनमध्ये एचएमपीव्ही उद्रेक देशात सतर्क तेचा इशारा
चीनमध्ये सध्या मानवी मेटान्यूमोव्हायरसचा (एचएमपीव्ही) उद्रेक सुरू आहे. राज्यात अद्याप या विषाणूचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही, असे आरोग्य विभागाने रविवारी स्पष्ट केले. दरम्यान, एचएमपीव्हीबाबत दक्षतेसह सर्दी-खोकल्याच्या रुग्णांच्या सर्वेक्षणाचे पाऊल आरोग्य विभागाने उचलले आहे. आरोग्य विभागाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर म्हणाले, ‘मानवी मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) श्वसन संसर्गास कारणीभूत ठरतो. हा विषाणू पहिल्यांदा नेदरलँडसमध्ये २००१ मध्ये आढळला. हा एक सामान्य श्वसन विषाणू असून, तो श्वसनमार्गाच्या वरील भागातील संसर्गास कारणीभूत ठरतो. हा एक हंगामी साथरोग आहे आणि फ्ल्यूप्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्भवतो. राज्यात आतापर्यंत एचएमपीव्हीचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही.’
एचएमपीव्हीचा धोका वाढल्याने आरोग्य विभागाने राज्यातील श्वसन संसर्गाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे. राज्यात २०२३ च्या तुलनेत डिसेंबर २०२४ मध्ये श्वसन संसर्गात कोणतीही वाढ झालेली दिसून आलेली नाही. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी श्वसनविकाराच्या संसर्गापासून आपला बचाव करण्यासाठी काळजी घ्यावी, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे.