- Hindi News
- पुणे
- तब्बल ३ हजार विद्यार्थ्यांच्या सामुहिक वंदे मातरम् गायनातून राष्ट्रीय एकात्मतेचा अद्वितीय आविष्कार
तब्बल ३ हजार विद्यार्थ्यांच्या सामुहिक वंदे मातरम् गायनातून राष्ट्रीय एकात्मतेचा अद्वितीय आविष्कार
राष्ट्रीय एकता आणि देशभक्तीचे प्रतीक असलेले बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेले रवींद्रनाथ टागोर यांनी संगीतबद्ध केलेले 'वंदे मातरम्' हे प्रेरणागीत पुण्यातील तब्बल ३ हजार शालेय विद्यार्थ्यांनी एकत्रित गायले. यावेळी 'भारत माता की जय' आणि 'जय हिंद' चा एकच जयघोष स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर घुमला. तीन हजार विद्यार्थ्यांचा एकसंध आवाज आणि त्यातून व्यक्त झालेल्या देशप्रेमाने वातावरण भारावून गेले.
हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेतर्फे हिंदू सेवा महोत्सवाचे आयोजन स.प.महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले होते. त्यामध्ये सामुहिक वंदे मातरम कार्यक्रमांतर्गत वीरमाता, वीरपत्नी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मेजर जनरल अमर कृष्णा (नि.), हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचे राष्ट्रीय संयोजक गुणवंत कोठारी, संस्थेचे अध्यक्ष अशोक गुंदेचा, महोत्सवाचे अध्यक्ष कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, संस्थेचे महामंत्री किशोर येनपुरे, विंग कमांडर विनायक डावरे (नि.), अर्चना सिंग, माजी सैनिक सुनील काळे, यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमात वीरमाता, वीरपत्नी यांचा सन्मान करण्यात आला. राज्याच्या विविध भागातून वीरमाता, वीरपत्नी यावेळी उपस्थित होत्या. वंदे मातरम् या गीताचा इतिहास यावेळी कार्यक्रमात सांगण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी समूहगान सादर केले. अशोक गुंदेचा म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना रुजवण्यासाठी विद्यार्थ्यांना सहभागी करुन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक ठरलेल्या वंदे मातरम् या गीताच्या निर्मिती मागील संपूर्ण इतिहास उलगडण्यात आला.
अमर कृष्णा म्हणाले, विद्यार्थ्यांनी चारित्र्य घडविण्यावर भर द्यायला हवा. चारित्र्यसंपन्न व्यक्तीच राष्ट्रनिर्माणात आपले योगदान देऊ शकते. चारित्र्य, प्रामाणिकपणा, शिस्त या गुणांचा विकास करण्यावर भर दिला तरच तुम्ही देशासाठी काहीतरी चांगले काम करू शकाल.