- Hindi News
- पुणे
- अमित शहा यांच्या वक्तव्याचा पुण्यात आम आदमी पार्टीच्या वतीने आंदोलन करून निषेध
अमित शहा यांच्या वक्तव्याचा पुण्यात आम आदमी पार्टीच्या वतीने आंदोलन करून निषेध
केंद्रीय गृहमंत्री यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा आम आदमी पार्टीच्या वतीने आंदोलन करून निषेध करण्यात आला. लोकशाहीचे स्मारक असलेल्या भारताच्या संसदेत गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अत्यंत बेजबाबदारीचे आणि घृणास्पद वक्तव्य करून या देशातील करोडो लोकांच्या भावना दुखावण्याचे काम अमित शहा यांनी केले आहे. त्यांच्या या कृतीचा निषेध आम आदमी पार्टीच्या वतीने आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुणे स्टेशन परिसरातील स्मारकासमोर आंदोलन करून करण्यात आला. यावेळी आंदोलकांच्या वतीने अमित शहा यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या तसेच त्यांच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन करण्यात आले.
देशातील अनेकांचे श्रद्धास्थान असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीने षड्यंत्र रचले जात असून लोकसभेत 400 पार करू न शकलेल्या आणि त्यामुळेच संविधानात बदल करु न शकलेल्या भारतीय जनता पक्षाचे खरे रूप आता सर्वसामान्य नागरिकांसमोर येऊ लागले आहे. बाबासाहेबांचा अपमान हा करोडो भारतीयांचा अपमान आहे. ज्या बाबासाहेबांनी करोडो भारतीयांना समाजात एक प्रतिष्ठा आणि सन्मान मिळवून दिला त्यांच्या प्रति संसदेत अशा प्रकारचे विधान करणे ही भाजपची कलुषित विचारसरणी दर्शवते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वरती असलेल्या आकासापोटीच भारतीय जनता पार्टीच्या वतीने अशा प्रकारची विधाने केली जात आहे. जेणेकरून समाजामध्ये दुही निर्माण व्हावी आणि त्याचा फायदा भाजपला राजकारणासाठी व्हावा असा आरोप यावेळी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेणे म्हणजे फॅशन झाले आहे, अशा प्रकारचे वक्तव्य करून बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील अधिकार सर्वसामान्यांना नाकारला जात आहे ? भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांशिवाय इतर कोणाला बाबासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार राहिला नाही का? असे प्रश्न यावेळी आंदोलन कर्त्या कार्यकर्त्यांकडून विचारण्यात आले. खरे पाहता महात्मा गांधी नंतर या देशातील सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ती हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आहेत परंतु या भाजपा सरकारने मग ते केंद्रातील असो किंवा राज्यातले नेहमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा केवळ निवडणुकीपुरता वापर केला. महाराष्ट्रात गेल्या दहा वर्षापासून भाजप सरकार असून देखील इंदू मिलमध्ये उभारल्या जाणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा प्रश्न सोडवलेला नाही. यावरूनच भाजपाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल असलेल्या कळवळा दिसून येतो असा आरोप यावेळी पक्षाच्यावतीने करण्यात आला.