- Hindi News
- पुणे
- रुग्णवाहिका चालकांच्या कुटुंबीयांची आर्थिक स्थिती बिकट, उपासमारीची वेळ
रुग्णवाहिका चालकांच्या कुटुंबीयांची आर्थिक स्थिती बिकट, उपासमारीची वेळ
जिल्हा परिषदेकडून सलग दहा महिन्यांपासून पगार नाही : प्रशासन दखल घेत नसल्याने चालकांना मनस्ताप.
कोव्हिड काळात चार ते पाच ग्रामपंचायतींचा १४ व्या वित्त आयोगाचा निधी एकत्रित करून नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात एक रुग्णवाहिका पुणे जिल्हा परिषदेकडून खरेदी करण्यात आली. या रुग्णवाहिकांना चालक पुरवण्यासाठी ठेका देण्यात आला आहे पण सलग दहा महिन्यांपासून या चालकांचा पगार झाला नसल्याने त्यांच्या कुटुंबियांची आर्थिक स्थिती बिकट झाल्याने उपासमारीची वेळ आली आहे.
जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांवर रुग्णवाहिका सेवा पुरवणाऱ्या कंत्राटी चालकांना पुणे जिल्हा परिषदेतर्फे दहा महिन्यांपासून पगार देण्यात आला नाही. यामुळे त्यांच्यावर कर्जबाजारी होण्याची व त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. याबाबत पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य विभाग व इतर प्रशासनाकडू कोणतीही दखल घेतली जात नसल्याने चालकांना मनस्ताप झाला आहे. रुग्णवाहिका चालवताना चालकांनी २४ तास दिलेल्या सेवेच्या तुलनेत या योजनेच्या माध्यमातून अवघे १० हजार ५०० रुपये एवढे कमी मानधन दिले जाते. हा २०२३ फेब्रुवारी - मार्च महिन्यापासून चा पगार मिळाला नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यांना इतर पीएफ, ईएसआय सारख्या पुरविल्या जाणाऱ्या सेवेचेही दीड वर्षांपासूनचे हप्ते थकल्याची धक्कादायक माहिती समोर येत असून याबाबत पुरंदर तालुक्यातील नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रातील सचिन ननावरे, वाल्हा प्राथमिक आरोग्य केंद्रातील संदीप भुजबळ, बेलसर प्राथमिक आरोग्य केंद्रातील रोहिदास चव्हाण, माळशिरस प्राथमिक आरोग्य केंद्रातील राजेंद्र कांबळे, परिंचे प्राथमिक आरोग्य केंद्रातील संदीप जाधव यांनी 'लोकमत सोबत बोलताना आपली व्यथा मांडली.
दरम्यान, याबाबत ठेकेदारांशी संपर्क करण्याचा प्रयत्न असता ते फोन उचलत नाहीत तर तालुका आरोग्य अधिकारी अथवा जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी याबाबत संपर्क केला असता मंत्रालयातूनच निधी आली नसल्याने आम्ही आपला पगार देऊ शकत नसल्याचे सांगितले जाते. यामुळे आम्हा चालकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. मुलांच्या शाळेचा खर्च कुठून करायचा असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. तर कर्जाचे हप्ते थकले असून ते वाढत चालले असल्याचे सांगितले. याबाबत ठेकेदार शारदा सर्व्हिसेस या कंपनीच्या व्यवस्थापनाकडे संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही तर जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आपण नंतर बोलू असे सांगितले.