डॉ.शिवाजीराव कदम यांना इस्माईलसाहेब मुल्ला जीवनगौरव पुरस्कार प्रदान

      "महाराष्ट्र  हे  देशातील एकमेव असे राज्य आहे की ज्या  राज्यात सर्वात जास्त अनुदानित महाविद्यालये आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील ,महर्षी धोंडो केशव कर्वे, पंजाबराव देशमुख या महामानवांच्या दूरदृष्टी व शैक्षणिक चळवळीमुळे हे शक्य झाले. बहुजन समाजाला पुढे घेऊन जाण्याचे  काम या समाजसुधारकांनी केले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पावनभूमीत आजही ही शैक्षणिक चळवळ चिरंतर सुरु आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०ची अंमलबजावणी सुरू झाली असून कौशल्याच्या जोरावर भारत जगात सर्वात ह्युमन रिसोर्स देणारा देश ठरणार आहे असे मत  महाराष्ट्र राज्याचे  उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर यांनी व्यक्त केले.

        पै.इस्माईल साहेब मुल्ला  यांच्या ५१ व्या पुण्यतिथीनिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या वतीने दिला जाणारा यंदाचा ‘इस्माईलसाहेब मुल्ला जीवनगौरव पुरस्कार’  या वर्षी भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांना शैलेंद्र देवळाणकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून  बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी होते. कार्यक्रमास संस्थेचे   व्हाईस चेअरमन  ॲड.भगीरथ शिंदे, संघटक डॉ. अनिल पाटील,  मॅनेजिंग कौन्सिल  सदस्य रामशेठ  ठाकूर,  कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के, ॲड. दिलावर मुल्ला,  ॲड.  रवींद्र पवार, जे.के. जाधव, सचिव विकास देशमुख,  सहसंचालक बच्छावसाहेब, संस्थेचे सहसचिव प्रिं.शिवलिंग मेनकुदळे, बंडू पवार, प्रिं.डॉ. राजेंद्र मोरे  इत्यादीं मान्यवर उपस्थित होते.

       महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात सतत नवीन  काही घडते हे सांगताना  श्री. देवळाणकर  पुढे म्हणाले की, "भारत देशामध्ये महाराष्ट्र एकमेव राज्य असे आहे की त्या राज्याने नॅक मूल्यांकन अनिवार्य केले. विद्यार्थ्याला महाविद्यालयात उच्च दर्जाच्या सोयी सुविधा मिळाव्यात, उत्तम प्राध्यापक मिळावेत, संशोधन व्हावे यासाठी देशात महाराष्ट्र एकमेव राज्य आहे की त्यांनी अनेक महाविद्यालयांमध्ये नॅकच्या माध्यमातून उत्तम पायाभूत सुविधा निर्माण केल्या. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्रजी प्रधान हे स्वतः मान्य करतात की मी महाराष्ट्रात आल्यानंतर नवीन काहीतरी घेऊन जात असतो. यावरून महाराष्ट्रातील शिक्षणातील नवनवीन बदलांची नोंद देशात होत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- २०२० याची अंमलबजावणी देखील महाराष्ट्रात लागू झाली आहे. प्रथम सत्राची परीक्षा सुद्धा नवीन पद्धतीने घेतली जात आहे. डॉ. रघुनाथ माशेलकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कार्यबल कमिटी स्थापन केलेली असून त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२४  पासून आपण  राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- २०२० ची प्रभावी अंमलबजावणी करीत आहोत. भारत देश विकसित होण्याच्या मार्गावर आहे.देश विकसित होण्यासाठी अणु क्षेपणास्त्र यांची गरज नसून तरुण पिढीचे परफॉर्मनन्स हाच  महत्त्वाचा भाग आहे. भारत हा ह्यूमन रीसोर्स उपलब्ध करून देणारा, सेवा पुरवणारा  जगात सर्वात जास्त मोठा देश आहे. शिक्षण हे कौशल्यावर आधारित असले तरच विकसित भारत होऊ शकतो त्यासाठी सर्वांनीच यासाठी योगदान देणे गरजेचे आहे. आज ज्यांना  इस्माईलसाहेब मुल्ला पुरस्कार दिला जात आहे ते  कदम साहेब आणि मी अनेक कमिटीमध्ये एकत्रित काम केले आहे. त्यावेळी कदम साहेब अध्यक्ष मी सदस्य असायचो. आज  सदस्याच्या हस्ते अध्यक्षांचा सत्कार होत आहे हा माझ्यासाठी  भाग्याचा क्षण आहे.अशी कृतज्ञता व्यक्त करीत त्यांनी डॉ.शिवाजीराव कदम यांचा गौरव केला.

       भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम म्हणाले "इस्माईलसाहेब मुल्ला यांनी शिक्षण क्षेत्रात   समर्पण करून आणि निष्ठेने काम केले. त्यांच्या नावाचा पुरस्कार मला मिळाला ही अतिशय अभिमानाची व समाधानाची घटना आहे. माझ्याच कुटुंबाने माझा मोठा सत्कार केला आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या "कमवा आणि शिका" या योजनेतून मी माझे शिक्षण पूर्ण केले. सोनसळसारख्या छोट्याशा गावातून चार ते पाच किलोमीटर पायी चालून मी माझे शिक्षण पूर्ण केले. लाईट,रस्ते, वाहतूक  कोणत्याही सुविधा नसताना महाविद्यालयात  शिक्षण घेतले. कमवा व शिकाची मदत मिळाली आणि मला बळ मिळाले. मला अनेक पुरस्कार मिळाले पण रयत शिक्षण संस्थेचा ‘इस्माईलसाहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्कार’ हा अतिशय भावनिक आणि मनाला समाधान देणारा आहे. रयतमध्ये त्याग व निस्वार्थ सेवा हा उत्तम संस्कार आहे. मुल्लासाहेब हे अण्णांचे चाहते होते. त्यांच्या रक्तात सुद्धा अण्णांचा विचार होता म्हणूनच आज रयत शिक्षण संस्था आशिया खंडातील सर्वात मोठी एक प्रभावी शिक्षण संस्था आहे. अनेक विद्यार्थी या संस्थेतून घडले. सातत्य,गुणवत्ता. विविधता याच्याशी रयतने कधीही तडजोड केली अशी  रयतची वैशिष्ट्यपूर्णता त्यांनी यावेळी विशद केली.

      अध्यक्षीय मनोगतात  चेअरमन  चंद्रकांत दळवी म्हणाले की  " ४ ऑक्टोबर १९१९  ला रयत शिक्षण संस्थेची काले या ठिकाणी स्थापना झाली. सुरुवातीला १९२४  मध्ये सातारा येथे  चार विद्यार्थी  घेऊन स्वतःच्या घरातच वसतिगृह  सुरू केले व नंतर १९२७  ला महात्मा गांधी यांना निमंत्रित करून त्याच वसतिगृहाचे  "श्री. छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस"असे नामकरण केले. सुरुवातीला अण्णांचेच  घर हे वसतिगृह होते. कर्मवीरांनी गरीब, होतकरू अशीच मुले  निवडली आणि वसतिगृहात आणली. कुणाला घ्यायचे  ही  विलक्षण अशी दूरदृष्टी कर्मवीरांना   होती. इस्माईलसाहेब मुल्ला, रामभाऊ नलवडे, बा.म.ठोके, बॅरि. पी.जी. पाटील यांच्यासारख्या असंख्य  विद्यार्थ्यांना पैलू पाडण्याचे काम कर्मवीरांनी केले. त्यातीलच एक इस्माईलसाहेब मुल्ला. यांचे जीवन अतिशय खडतर. कमी वयात आई गेली.स्वतःचे दुःख पचवून शिक्षणानंतर संस्थेची त्यांनी निस्वार्थ सेवा केली.रयत शिक्षण संस्थेसाठी त्यांचे योगदान खूप  मोठे असल्याचे त्यांनी सांगितले. 

      इस्माईलसाहेब  मुल्ला पुरस्काराच्या रकमेत डॉ. शिवाजीराव कदम यांनी स्वतःचे चार लाख रुपये देऊन एकूण पाच लाख रुपये देणगी रयत शिक्षण संस्थेला देऊ केली.या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ.एम.ए. शेख संपादित  ‘समिधा’ या ग्रंथाच्या तिसरया आवृत्तीचे प्रकाशन  प्रमुख अतिथी व मान्यवरांच्या यांच्या हस्ते करण्यात आले.  कार्यक्रमाच्या प्रारंभी  संस्थेचे सचिव  विकास देशमुख यांनी प्रास्ताविक करून सर्वांचे स्वागत केले. डॉ.शिवाजीराव कदम यांना  देण्यात आलेल्या मानपत्राचे  वाचन प्रिं.डॉ.शिवलिंग मेनकुदळे यांनी केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. सविता मेनकुदळे यांनी केले. आभार प्राचार्या डॉ. वैशाली जाधव यांनी मानले.

    या कार्यक्रमास संस्थेचे विभागीय चेअरमन डॉ.एम.ए.शेख, डॉ.अशोक भोईटे, प्रिं. डॉ. मोहन राजमाने, प्रिं.डॉ. भारत जाधव, डॉ.अशोक भोईटे, लालासाहेब खलाटे, संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल  सदस्य,जनरल बॉडी सदस्य, आजीव सभासद, आजीव सेवक, मुल्ला कुटुंबीय, रयत सेवक मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

 

Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

माण तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दौलत नाईक व उपाध्यक्ष पदी लिंगराज साखरे यांची बिनविरोध निवड

Latest News

माण तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दौलत नाईक व उपाध्यक्ष पदी लिंगराज साखरे यांची बिनविरोध निवड माण तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दौलत नाईक व उपाध्यक्ष पदी लिंगराज साखरे यांची बिनविरोध निवड
        दहिवडी ता. माण येथिल शासकीय विश्रामगृहावर माण तालुका पत्रकार संघाची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत माण तालुका पत्रकार
राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत सातारा संघाचा दणदणीत विजय
मांढरदेव श्री क्षेत्र काळूबाईदेवीची यात्रा सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने जबाबदाऱ्या पार पाडाव्यात- जिल्हाधिकारी संतोष पाटील
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे ऑनलाईन अर्ज करण्यास १५ जानेवारीपर्यंतची अंतिम मुदत
इचलकरंजीत दूषित पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करेन- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software