- Hindi News
- सातारा
- मांढरदेव श्री क्षेत्र काळूबाईदेवीची यात्रा सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने ज...
मांढरदेव श्री क्षेत्र काळूबाईदेवीची यात्रा सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने जबाबदाऱ्या पार पाडाव्यात- जिल्हाधिकारी संतोष पाटील
मांढरदेव श्री क्षेत्र काळूबाईदेवीची यात्रा 12 जानेवारी ते 29 जानेवारी या कालावधीत होणार आहे. यात्रा शांततेत, उत्साहात व सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करुन आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात.यात्रा कालावधीत कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी सर्वानी दक्ष रहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.
मांढरदेव, ता. वाई येथे एमटीडीसी हॉलमध्ये मांढरदेव यात्रेची पूर्व नियोजन तयारीबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, जिल्हा शल्य चिकित्सक युवराज करपे, मांढरदेव देवस्थानचे प्रशासकीय विश्वस्त तथा वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, पुणे जिल्ह्यातील भोर उपविभागाचे प्रांताधिकारी विकास खरात, वाई उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम, भोर उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, वाईचे तहसीलदार सोनाली मेटकरी, खंडाळाचे तहसीलदार अजित पाटील, भोरचे तहसीलदार राजेश नाजन, प्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक रवींद्र आवळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे आदी उपस्थित होते.
मांढरदेवी हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून अनेक पिढ्यांपासून यात्रा महोत्सव होत आहे असे सांगून जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, यात्रा उत्साहात व सुरक्षित वातावरणात पार पाडायची संयुक्त जबाबदारी ट्रस्ट, प्रशासन आणि स्थानिक या सर्वांची आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचे ट्रस्टने व्यवस्थापन करावे. यात्रेसाठी येणारा प्रत्येक भाविक सुखरुप पणे आला पाहिजे, समाधानाने देविचे दर्शन घेऊन तो परत गेला पाहिजे यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी यंत्रणांनी घ्यावी. यात्रेत पशुहत्या होणार नाही याची सर्वोतपरी खबरदारी घ्यावी. या काळात पशुपक्षी बळी प्रतिबंध करण्याकरीता भरारी पथकांची नियुक्ती करण्यात यावी. यात्रेदरम्यान देवीचे वार व सुट्टीचे दिवस असल्याने स्थानिक व परराज्यातील भाविक लाखोंच्या संख्येने मांढरदेव गडावर उपस्थित राहतात. यासाठी उपलब्ध जागा व सुविधांचा पुरेपूर वापर झाला पाहिजे.
12 जानेवारी यात्रेचा मुख्य दिवस असून 13 जानेवारी रोजी देवीची महापूजा व 14 जानेवारी उतरती यात्रा आहे. यात्रेदरम्यान भाविकांना प्रशासनामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सुविधांच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. यात्रा कालावधीत सामाजिक सुरक्षिततेसाठी ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. उपद्रवमुल्य असणाऱ्या शक्तींचा शोध घेऊन कारवाई करण्यात येणार आहे.
खराब दुग्ध व खाद्यपदार्थांची विक्री होणार नाही याची विक्रेत्यांनी खबरदारी घ्यावी.अन्नपदार्थांचा साठा करुन खराब अन्न पदार्थ विक्री होऊन अन्न विषबाधेच्या घटना घडल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल. भेसळयुक्त पदार्थांची विक्री होणार नाही यासाठी अन्न व औषध विभागाने विशेष दक्षता घेऊन भरारी पथके नेमावीत. अन्न पदार्थाचे मोठ्या प्रमाणात सॅम्पलींग करावे. खाद्यविक्रेत्यांची बैठक घेऊन याबाबत सूचना द्याव्यात, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी दिले.
उत्सवाचा कालावधी जवळपास 17 दिवसांचा राहणार असल्याने यात्रा कालावधीत 24 तास अखंडीत विद्यूत पुरवठा राहील याची आवश्यक ती खबरदारी घेवून विद्यूत विभागाने मागणीप्रमाणे विद्यूत जोडणी द्यावी. खाली आलेल्या वीज तारांची दुरुस्ती करावी. 12 ते 14 जानेवारी हे तीन दिवस यात्रापरिसरात ड्राय डे घोषित करण्यात येणार असून आजूबाजूच्या गावांमध्येही त्याची अंमलबजावणी करण्याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने या अनुषंगाने प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी.
सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील खड्डे भरुन घ्यावेत. रस्त्यावर खड्यांमुळे वाहन बंद पडणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे असे सांगून जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, अपघात प्रवण रस्त्यावरील ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस विभाग यांनी संयुक्तपणे भेट द्यावी व आवश्यक त्या उपाय योजना कराव्यात.
यात्रेत 3 लाखांपेक्षा जास्त भाविक येण्याची शक्यता असल्याने गर्दी होणार आहे. भाविकांना चक्कर येणे, हायपोमध्ये जाणे, यासारख्या घटना घडू शकतात. त्या टाळण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी तसेच या कालावधीमध्ये विविध ठिकाणी उपलब्ध ठेवण्यात आलेल्या डॉक्टर व औषध सुविधांबाबत जनजागृती आरोग्य विभागाने करावी. 60 ते 65 टक्के भाविक भोर तालुक्यातून येतात. त्यामुळे या तालुक्यातील आरोग्य विभागाकडील ही मनुष्यबळाचा उपयोग करावा. अधिग्रहीत केलेल्या खाजगी हॉस्पीटलमधील बेड व उपचार करणारे डॉक्टर्स राखीव राहतील याची दक्षता घ्यावी. कार्डीयाक ॲब्युलन्सही उपलब्ध ठेवावी.
राज्य परिवहन विभागाने यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांची दळणवळण व्यवस्था चोखपणे पार पाडण्यासाठी विशेष गाड्यांचे व फेऱ्यांचे नियोजन करावे. घाट रस्ता असल्याने एसटी बसेस बंद पडणार नाहीत अशा बसेस पुरवाव्यात.एखादे वाहन बंद पडल्यास ताबडतोब बाजूला करण्यासाठी क्रेनची व्यवस्था ठेवावी. चांगली वाहने व सक्षम कर्मचारी कार्यरत ठेवावेत. वाहनतळावर भाविकांकरीता किमान मुलभूत सोयी सुविधांची व्यवस्था करावी. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रकाची प्रसिध्दी करावी.
कचऱ्याचे व्यवस्थापन योग्य पध्दतीने व वेळेत झाले पाहीजे. मोबाईल टॉयलेट पुरेसे उपलब्ध ठेवावेत, यात्रेत परिसरात स्वच्छतेसह शुध्द पिण्याचा पुरवठा करावा, यात्रेसाठी येणाऱ्या खाजगी वाहनांचे पार्कींग व्यवस्था निश्चीत करावी, यात्रेत सुविधा पुरविणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी ओळखपत्रे परिधान करणे अनिवार्य आहे, असेही जिल्हाधिकारी श्री. संतोष पाटील यांनी निर्देश दिले.