देश-विदेश

जम्मू-काश्मीरमध्ये CRPF जवानांवर दहशतवादी हल्ला; दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांचा गोळीबार

ही बातमी मित्रांसोबत शेअर करा:

दुपारी नाकाबंदीच्या ठिकाणी जवानांना केले लक्ष्य; दोन जवान जखमी, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा यंत्रणांची मोहीम सुरू

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) जवानांना लक्ष्य करून दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याची घटना बुधवारी (११ नोव्हेंबर) घडली. अखरान परिसरात मीर बाजारजवळ असलेल्या CRPF च्या सुरक्षा चौकीवरील जवानांवर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी अचानक गोळीबार केला. या घटनेत दोन CRPF जवान जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी सुमारे २ वाजून १५ मिनिटांनी हा हल्ला झाला. नाकाबंदीच्या ठिकाणी तैनात असलेल्या सुरक्षा जवानांवर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.

या हल्ल्यात जखमी झालेल्या दोन्ही जवानांना तातडीने अनंतनाग जिल्ह्यातील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. घटनेनंतर सुरक्षा यंत्रणांनी तातडीने हालचाली सुरू केल्या असून, फरार हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी संबंधित परिसराला वेढा घालून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे कुलगाम परिसरातील सुरक्षा व्यवस्थेसमोर आव्हान निर्माण झाले आहे. हल्लेखोरांची ओळख पटविण्यासह त्यांच्या हालचालींचा माग काढण्याचे काम सुरक्षा यंत्रणांकडून सुरू आहे. या हल्ल्यामागील नेमका उद्देश आणि हल्लेखोरांबाबतची अधिक माहिती तपासानंतर समोर येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून, हल्लेखोरांना पकडण्यासाठी शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे.

error: Content is protected !!