पुणे

दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी अखेर जेरबंद; वडगाव बुद्रुकमधून गुन्हे शाखेची धडक कारवाई!

ही बातमी मित्रांसोबत शेअर करा:

पुणे : गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देत फरार असलेल्या आरोपीला अखेर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ३ ने अटक केली आहे. सिंहगड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मारहाणीच्या गुन्ह्यातील या आरोपीला वडगाव बुद्रुक येथील बसस्थानक परिसरातून पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, आरोपी आपल्या राहत्या घराजवळच असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले.

    अमेय ऊर्फ अम्या संतोष रायचूरकर (वय २५, रा. वडगाव बुद्रुक बसस्थानक, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६९/२०२४ अन्वये भारतीय दंड संहितेच्या कलम ३२३, ३२४ आणि ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तो मागील दोन वर्षांपासून पोलिसांना हवा होता.

२ नोव्हेंबर २०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट ३ चे पथक सिंहगड रोड पोलीस ठाणे तसेच संबंधित पोलीस ठाण्यांच्या हद्दीत फरार आरोपींचा शोध घेत पेट्रोलिंग करत होते. यावेळी पोलीस अंमलदार किशोर शिंदे, कैलास लिम्हण आणि योगेश झेंडे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत अमेय रायचूरकर हा वडगाव बुद्रुक बसस्थानक परिसरात राहत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

माहिती मिळताच वरिष्ठांना कळवून पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने हालचाली केल्या. आरोपीच्या घराजवळील परिसराची पाहणी करून पोलिसांनी चोहोबाजूंनी सापळा रचला. आरोपीला पळून जाण्याची कोणतीही संधी न देता त्याला राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर आरोपीला गुन्हे शाखा युनिट ३ च्या कार्यालयात नेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसमोर हजर करण्यात आले. चौकशीदरम्यान तो सिंहगड पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. पुढील तपास आणि कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला अहवालासह सिंहगड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) शैलेश संख्ये यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे आणि त्यांच्या पथकाने केली.

error: Content is protected !!