श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्याला भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कृष्णा नगर : महाराष्ट्रातील तमाम स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचे दर्शन घडविण्यासाठी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांच्या माध्यमातून गेली अठ्ठावीस वर्षे श्री स्वामी समर्थ पालखी पदयात्रेचे आयोजन करण्यात येते. सदर परिक्रमा हे २८वे वर्ष असून, सदर पादुका नोव्हेंबर २०२४ ते जून २०२५ पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभर दौऱ्यावर असणार आहेत. ज्यांना अक्कलकोटला जाऊन दर्शन घेता येत नाही, त्यांना या पालखी सोहळ्याद्वारे दर्शनाचा लाभ घेता येतो.
सदर पालखी परिक्रमेचे आयोजन श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोटचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजय राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. तसेच, श्री स्वामी समर्थ सेवेकरी मंडळ गोविंद नगरी यांचेही यामध्ये सहकार्य लाभले आहे.
सातारा जिल्ह्यातही स्वामी समर्थ पादुकांचे मोठ्या भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. टाळ-मृदंगाच्या गजरात ही पालखी मार्गस्थ झाली. परिक्रमेच्या मार्गावर फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या, तर भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.
रात्रभर भजन-कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यावेळी सेवेकरी मंडळाच्या वतीने भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले. अनेक भक्तांनी आपापल्या घरी यजमान म्हणून सेवा करण्याची संधी घेतली.
श्री स्वामी समर्थ सेवेकरी मंडळ गोविंद नगरी गेली २६ वर्षे साताऱ्यात हा पालखी सोहळा आयोजित करत आहे. मंडळाचे उपाध्यक्ष प्रशांत बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे हा सोहळा पार पडला. मंडळाच्या वतीने सामाजिक उपक्रमही राबवले जातात.
