MPSC सचिव महेंद्र हरपळकर पदावरून मुक्त; पुण्यात उमेदवारांचे आंदोलन सुरूच
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कामकाजासंदर्भात स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांकडून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयोगाचे सचिव महेंद्र हरपळकर यांना पदावरून मुक्त करण्यात आले आहे.
राज्य शासनाने शुक्रवारी याबाबत आदेश काढला असून, हरपळकर यांची सचिवपदावरील प्रतिनियुक्ती प्रशासकीय कारणास्तव समाप्त करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यांना तातडीने पदभार दुसऱ्या अधिकाऱ्याकडे सोपविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
MPSCच्या कारभाराबाबत उमेदवारांकडून विविध मागण्या करण्यात येत आहेत. यापूर्वी औषध निरीक्षक पदाची परीक्षा पेपरफुटीच्या प्रकरणानंतर रद्द करण्यात आली होती. राज्यसेवा परीक्षेच्या निकाल व मूल्यमापन प्रक्रियेबाबतही काही उमेदवारांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
दरम्यान, पुण्यातील आंदोलनस्थळी उमेदवारांचे सत्याग्रह आंदोलन सुरू असून, आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यासह अन्य मागण्यांवर उमेदवार ठाम आहेत. काही राजकीय नेत्यांनीही आंदोलनस्थळी भेट देऊन उमेदवारांशी संवाद साधला.
