१६० व्या वर्षानिमित्त मलवडी शाळेत १६० रोपांची लागवड
दहिवडी: मलवडी (ता. माण) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस यंदा १६० वे वर्ष पुर्ण होत असल्याचे औचित्य साधून शाळेच्या आवारात १६० रोपांची लागवड करण्यात आली.या शाळेची स्थापना १८ नोव्हेंबर १८६४ रोजी झाली. यंदा १६० व्या वर्षानिमित्त सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. कला, क्रिडा, सांस्कृतिक उपक्रमासोबतच वृक्षारोपणाचाही उपक्रम घेण्यात आला. मलवडीचे उदयोन्मुख कवी मोहसीन आतार यांनी गुलाबाची विविध रंगाची शंभर रोपे दिली तर कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक प्रशांत जाधव यांनी पामची शंभर रोपे दिली.
या सर्व रोपांची लागवड करण्यासाठी ग्रामस्थ व पालकांना निमंत्रित करण्यात आले होते. ग्रामस्थ व पालकांनी सुध्दा भरभरुन प्रतिसाद देत शिक्षक व विद्यार्थ्यांच्या मदतीने उत्साहाने वृक्षारोपण केले. यापूर्वी बापू देवकर यांनी दिलेली रोपे तरारून आली आहेत. या नवीन रोपांमुळे शाळा परिसर हिरवागार होणार आहे.
