महत्त्वाच्या बातम्या

मंत्री जयकुमार गोरेंची तक्रार : दहिवडी पोलिसांची मुंबईत कारवाई

खंडणीप्रकरणी तुषार खरातवर गुन्हा

दहिवडी : मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी थांबवायची असेल तर ५ कोटी रुपयांची खंडणी द्या, अन्यथा आणखी महिलांकडून खोटे गुन्हे दाखल करायला सांगेन, अशी धमकी दिल्याप्रकरणी तुषार खरात यांच्यावर दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतः याप्रकरणी तक्रार दिली आहे.

    तुषार उर्फ तात्यासो आबाजी खरात (मूळ रा. पांढरवाडी ता. माण जि. सातारा. सध्या रा. डॉ. दादाभाई हॉटेल नौरोजी रोड, मुंबई) असे संशयिताचे नाव आहे.याबाबत मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तुषार खरात हे मतदार संघातील रहिवासी आहेत. तुषार खरात हे माण तालुक्यामध्ये तसेच मुंबई येथून वार्तांकन करत असतात.

     तसेच सोशल मीडियावर लय भारी न्यूज चॅनेल व त्याच नावाचे फेसबुक अकाऊंट चालवतात. त्याच्या माध्यमातून त्यांनी जून २०२४ पासून ते आजअखेरपर्यंत वारंवार माझ्याबाबत सोशल मीडियावर जाणीवपूर्वक, हेतुपुरस्पर मानहानीकारक व बदनामीकारक पोस्ट प्रसिध्द केल्या आहेत. याप्रकरणी मंत्री गोरे यांनी खरात यांच्याविरुध्द दहिवडी येथील दिवाणी न्यायालय व उच्च न्यायालयातही दावा दाखल केलेला आहे.

     मंत्री जयकुमार गोरे यांनी तक्रारीत पुढे असे म्हटले आहे की, तुषार खरात यांच्याबाबत न्यायालयात दावे दाखल केले असताना काही दिवसापूर्वी खरात यांनी माझे कार्यकर्ते बळवंत पाटील यांना मुंबई येथे बोलावून घेतले. त्यावेळी त्या भेटीत खरात हे पाटील यांना म्हणाले की, ‘जयकुमार गोरे यांना मिटवून घ्यायाला सांगा. अन्यथा त्यांचे मंत्रीपद मी घालवणार आहे. मला फार मोठ्या राजकीय लोकांचा वरदहस्त आहे. सातारा शहर पोलिस स्टेशन येथे गोरेंवर दाखल असलेल्या महिलेच्या संदर्भात बनावट तक्रार केली आहे. ती तक्रार राज्यपाल यांच्याकडे केली असून त्याची क्लीपही बनवली आहे,’ अशी माहिती खरात यांनी बळवंत पाटील यांना दिली.

     जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या उद्देशाने खोटी बातमी पसरवली. तसेच तुषार खरात यांनी बळवंत पाटील यांना मिटवायचे असेल तर मंत्री जयकुमार गोरे यांना ५ कोटी रुपये द्यायला सांगा. त्यामधील १ कोटी रक्कम तक्रारदार महिलांना देणार आहे. उर्वरीत रक्कम माझ्यासाठी ठेवणार असल्याचे खरात म्हणाले. त्यावर बळवंत पाटील यांनी तुषार खरात यांना सांगितले की, मी गोरे साहेबांशी बोलतो आणि तुम्हाला सांगतो. याशिवाय म्हसवड येथील मंत्री गोरे यांच्या परिचयाचे असणारे विजय घट हे दहिवडी येथे असताना त्यांच्याशीही खरात यांनी फोन करुन संपर्क साधून हे प्रकरण मिटवण्यासाठी ५ कोटी रुपयांची मागणी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

      दि. ८ मार्च रोजी दहिवडी येथे मंत्री गोरे यांना बळवंत पाटील व बंडू घट हे भेटले. त्या दोघांनी वरीलप्रमाणे तुषार खरात हे प्रकरण मिटवण्यासाठी ५ कोटी रुपये मागत आहेत, असे सांगितले. यामुळे तुषार खरात हे हेतुपुरस्सर बदनामी करण्याची धमकी देवून व आणखी महिलांना खोट्या तक्रारी करायला लावण्याचा साथीदारांसह कट रचून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली व बळवंत पाटील व बंडु घट यांच्यामार्फत ५ कोटी रुपयांची खंडणीची मागणी करत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात खरात यांना ताब्यात घेतले.

      तुषार खरात यांच्यावर शनिवारी दहिवडी व वडूज पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. वडूज येथील पोलिस ठाण्यामध्ये शेखर सुरेश पाटोळे (वय ३६, रा. वडूज ता. खटाव) यांनी तुषार खरात व अनोळखी दोघांविरुध्द अॅट्रॉसिटीची तक्रार दिली असून याप्रकरणी वडूज पोलिसांनी खरात यांना ताब्यात घेतले आहे. पाटोळे यांनी

      तक्रारीत म्हटले आहे की, दि. १२ नोव्हेबर २०२४ रोजी वडूज गावच्या लय भारी यू ट्युब चॅनलचे पत्रकार तुषार खरात यांनी पांढऱ्या रंगाच्या कारमधून उतरून त्यांना थांबवले. यावेळी त्याने जातीवाचक शिवीगाळ करत त्या आमदाराच्या जीवावर उड्या मारु नको. आम्ही आमदाराला संपवण्याची सुपारी घेतली आहे. तुला पण आम्ही संपवू’, असे म्हणून तुषार खरात यांनी मारहाण केली. यावेळी अनोळखी दोन साथीदारांनी लाथ्याबुक्यांनी मारहाण केली. त्यावेळी तेथे असलेले सागर पाटोळे व आकाश तसेच जाधव यांनी भांडणे सोडवली.

     या घटनेनंतर दि. १६ जानेवारी २०२५ व दि. ४ मार्च २०२५ रोजी तुषार खरात यांनी व्हाटसअॅप ग्रुप व लय भारी यु ट्युब चॅनलवर त्यांच्याविषयी अश्लिल बोलून तो व्हिडीओ सोशल मीडियावर लय भारी यू ट्युब चॅनेलवरती पाठवून माझी बदनामी केली, असल्याचे तक्रारीत म्हटले. त्यावरुन पोलिसांनी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मुंबईतून खरात यांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोनि घनशाम सोनवणे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!