महत्त्वाच्या बातम्या

राज्यभर प्रसिद्ध असलेला सोंगे महोत्सव ओझर्डे येथे आज संपन्न होणार.

भुईंज : सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील ओझर्डे हे गाव. ओझर्डे गाव हे अनेक गोष्टींसाठी प्रसिध्द आहे , असाच एक प्रसिध्द महोत्सव म्हणजे  सोंगे महोत्सव. सोंगे महोत्सवासाठी ओझर्डे गाव पंचक्रोशीमध्ये सुप्रसिद्ध आहे.सोंगे महोत्सव सोहळा दरवर्षी रंगपंचमीच्या पहाटे 04.00 वाजता मुख्य मिरवणुकीने सुरू होतो. सोंगे म्हणजे चित्ररथ किंवा शोभायात्रा मिरवणूक होय.

   हा चित्ररथ गावामध्ये फिरवण्यासाठी पूर्वी बैलगाड्यांचा वापर होत होता पण आजकाल ट्रॅक्टर ट्रॉली चा वापर केला जातो. ही मिरवणूक गावातील दोन आळ्या (गल्ल्या) साळ आळी आणि माळ आळी पुढाकार घेऊन शांततेत पार पडतात.  तसा हा सोहळा होळी पासूनच सुरू होत असतो, कोण कोण कोणत्या गाड्या ( चित्र रथ) सजवणार याचे नेटके नियोजन केले जाते. ठरलेल्या प्रसंगानुसार सजावट करून संपूर्ण सेट गाडीवरती एका रात्री मध्ये उभा केला जातो, त्यासाठी साहित्य संकलन केले जाते, जसे की बांबू, फळ्या, पडदे, झालरी, वृक्षांच्या डहाळ्या, कापूस, पुटठे, फ्लेक्स बोर्ड, रंगीत कागदांचा इत्यादींचा वापर केला जातो. गाडी सजावटीमध्ये ओझर्डे गावच्या नागरिकांची सृजणशिलतेची चमक, अस्सल गावरानी कला आणि ठसका आपणास पाहायला मिळतो.

    सजावट करत असताना विषयही आकर्षक असतात ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय, आरोग्य, पौराणिक, रामायण-महाभारत, देशभक्ती  तसेच आजकालच्या चित्रपट व मालिकांमधील दृश्य  असे सेट उभे केले जातात.  ज्या  कलेने गाड्या सजवल्या जातात अगदी तितक्याच ताकदीने पात्रांची निवड करून त्यांची रंगभूषा, वेशभूषा करण्यात येते. यामध्ये स्त्रियांचे पात्र देखील पुरुषच साकारतात पोशाख व मेक-अप मुळे कोणी कोणते पात्र साकारलेलं आहे हे समजतच नाही.  यात सर्वात महत्त्वाची अष्टभुजा  (महिषासुर मर्दिनी) देवीची गाडी ही मानाची गाडी मानली जाते या दोन देवींची भेटीचा कार्यक्रम पद्मावती देवालया समोर होतो, हा ही पाहण्यासारखा असतो.

या महोत्सवामध्ये  सर्वधर्मीय तरुण-तरुणी बालगोपाळ आबाल वृद्ध अगदी सर्वजण सहभाग घेतात. लोककला जोपासून समाज प्रबोधन करणारे हे गाव. आनंद मनोरंजन जनजागृती व नवनिर्मितीचा ध्यास हेच सोंगे महोत्सवाचे खरे रूप व तेच ओझर्डेकर नागरिक जतन करण्याचा प्रयत्न आजही करीत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!