महत्त्वाच्या बातम्या

नऊ महिन्यांनंतर अंतराळातून सुखरूप परतल्या सुनीता विल्यम्स

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या सहकारी बूच विल्मोर यांनी तब्बल नऊ महिने अंतराळात अडकून पडल्यावर अखेर सुखरूप पृथ्वीवर पुनरागमन केले आहे. नासा आणि स्पेस एक्स यांच्या संयुक्त मोहिमेअंतर्गत हे दोघे भारतीय वेळेनुसार पहाटे 3:27 वाजता फ्लोरिडाच्या समुद्रात उतरले.

नऊ दिवसांचे मिशन नऊ महिन्यांचे झाले

5 जून 2024 रोजी सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मोर यांनी स्टारलाइनर यानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे (ISS) झेप घेतली होती. त्यांचा मूळत: फक्त आठ दिवसांचा प्रवास असणार होता. मात्र, अंतराळ यानात बिघाड झाल्याने त्यांना तब्बल 286 दिवस तिथेच थांबावे लागले.

अंतराळयानातील बिघाड आणि दीर्घ विलंब

स्टारलाइनर यानाने उड्डाण घेतल्यानंतरच त्यात अनेक तांत्रिक समस्या जाणवू लागल्या. विशेषतः सर्व्हिस मॉड्यूलमध्ये हेलियम वायूच्या गळतीचा मोठा बिघाड झाला. या समस्येमुळे अंतराळ स्थानकात असलेल्या तज्ञांसह, पृथ्वीवरील ह्यूस्टनच्या मिशन कंट्रोल टीमने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते अयशस्वी ठरले आणि यामुळे सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळ स्थानकातच अडकले.

स्पेस एक्स ड्रॅगन यानातून सुखरूप परत

दीर्घ प्रतीक्षेनंतर स्पेस एक्सच्या “ड्रॅगन” यानातून सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मोर यांना पृथ्वीवर आणण्याचा निर्णय घेण्यात आला. 18 मार्च 2025 रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 10:25 वाजता त्यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून परतीचा प्रवास सुरू केला.

सुमारे 17 तासांच्या प्रवासानंतर, ड्रॅगन यानाने भारतीय प्रमाण वेळेनुसार मध्यरात्री 2:41 वाजता पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला आणि 3:27 वाजता फ्लोरिडाच्या समुद्रात यशस्वी लँडिंग केले.

सर्व अंतराळवीर सुखरूप

अंतराळयानाच्या यशस्वी लँडिंगनंतर अर्ध्या तासातच रिकव्हरी टीमने सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बाहेर काढले. नासाच्या कमर्शिअल ग्रुप प्रोग्रामचे मॅनेजर स्टीव्ह स्टिच यांनी सर्व अंतराळवीर सुखरूप आणि चांगल्या प्रकृतीत असल्याची माहिती दिली.

ही मोहीम अंतराळ संशोधन क्षेत्रात एक मोठा अनुभव देणारी ठरली असून, भविष्यात अशा मिशनसाठी अधिक तयारीची गरज असल्याचेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!