जगाशी स्पर्धा करणारा माण-खटाव बनविणार :मंत्री जयकुमार गोरे
ज्यावेळी बारामती, कोल्हापूरमधील मुलींच्या आई-वडिलांकडून माझ्या माण-खटावच्या मायमाऊलीला विचारले जाईल, की माझ्या मुलीशी तुमच्या मुलाचं लग्न कराल काय?, त्यावेळी माझं काम संपेल. इथली दुष्काळी परिस्थिती पूर्णपणे संपेल तेव्हा माझं काम संपेल. आता मला जगाशी स्पर्धा करणारा माण-खटाव बनवायचा आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास व पंचायतराजमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
आंधळी (ता. माण) येथे आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी सोनिया गोरे, माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर, डी. एस. काळे, अर्जुन काळे, अरुण गोरे, शिवाजीराव शिंदे, गणेश सत्रे, संजय गांधी, किसन सस्ते, बलवंत पाटील, बाळासाहेब कदम, सिद्धार्थ गुंडगे, हरिभाऊ जगदाळे,
विशाल बागल, मीनाक्षी काळे, मनीषा काळे, गुलाब उगलमोगले, सोमनाथ भोसले, प्रा. राजेंद्र जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, “मी या मातीतून मोठा झालोय. तुम्ही ती लोकं आहात ज्यांनी माझं राजकारण उभं केलं. जातीपातीच्या छताडावर उभं राहून लोकांनी विकासासोबत, माणुसकीसोबत राहून मला मतदान केलंय. त्यामुळे मी कितीही मोठा झालो तरी आपल्यात अंतर पडणार नाही. मंत्रिपदाची हवा माझ्या डोक्यात जाणार नाही, तुम्ही काळजी करू नका. नेहमी सत्तेसोबत माणसं असतात; पण तुमची ही गर्दी कायम माझ्यासोबत आहे.”
गोरे म्हणाले, “प्रत्येक निवडणुकीत संघर्ष माझ्या पाचवीला पुजलाय. यावेळी सुद्धा माझ्या विरोधकांनी मला वडिलांचे अस्थिविसर्जन सुद्धा करू दिले नाही, लगेचच षडयंत्र सुरू झाली. मी आमदार होऊ नये, मंत्री होऊ नये म्हणून नदीच्या काठावर पूजा केल्या. मंत्री झाल्यावर पण पूजा केल्या. आपल्या मातीतला मंत्री झालाय म्हणल्यावर आनंद होईल, असं वाटलं; पण तसं झालं नाही; पण माझ्या पाठीशी माझ्या जनतेचा, मायमाऊलीचा आशीर्वाद कायम आहे.”
डॉ. दिलीपराव येळगावकर म्हणाले, “जयकुमार गोरे यांना ग्रामविकास खात्याचं मंत्रिपद मिळाल्यावर बारामतीकरांचा जळफळाट झाला. म्हणून बालंट आणण्याचा प्रयत्न केला; पण जयकुमार गोरे यांनी असा काही डाव टाकला की सर्व विरोधक धोबीपछाड झाले. जयकुमार गोरे यांच्या पाठीशी आम्ही छातीचा कोट करून उभे राहू.” यावेळी अर्जुन काळे, डी. एस. काळे यांची भाषणे झाली. लोकनियुक्त सरपंच दादासाहेब काळे यांनी प्रास्ताविक केले.
आंधळीकरांनी मागितलं अन् मी दिलं नाही असं कधी झालं नाही. श्री महालक्ष्मी मंदिरासाठी तीन कोटी रुपयांचा निधी मी देणार आहे, तसेच ग्रामपंचायत कार्यालय पूर्ण होईपर्यंत एक रुपयाचा निधी कमी पडणार नाही. यासोबतच नदीवरील पूल व इतर रस्त्यांसाठी सुद्धा निधी देण्यात येईल. मंत्री जयकुमार गोरे
