मानवी कल्याणासाठी जन्मले वर्धमान महावीर
अडीच हजार वर्षापूर्वी भगवान महावीरांचा जन्म झाला. मानवी हिंसाचाराचा उद्रेक झाल्याने मानवी कल्याणासाठी भगवान महावीरांना जन्म घ्यावा लागला. त्यांच्या पाच सिद्धांतांपैकी सत्य, अहिंसा व निर्लोभीपणा यांची सध्याच्या युगात तर अधिकच आवश्यकता आहे. या तीन मौलिक तत्त्वांच्या अभावानेच मानवी मूल्यांचा झपाटयाने -हास होत आहे. संपूर्ण मानवजात एका आत्मघाती स्फोटकाच्या कडयावर येऊन ठेपली आहे. असत्य, हिंसा आणि लोभीपण या दुर्गुणांमुळेचे प्राणीमात्र, सृष्टी आणि निसर्ग यांचा समतोल ढासळला आहे.
अहिंसेच्या साधनेसाठी अपरिग्रहाच्या साधनेचीही जरुरी आहे. कारण अहिंसा आणि अपरिग्रह या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जिथं परिग्रह आहे तिथं हिंसा निश्चित आहे. परिग्रहामुळंच महाभारतीय युद्ध झालं. पाचही इंद्रियांना जिकण्यासाठी साधनेची गरज आहे. हे जमलं तरच विषयांच्या धगीपासून दूर राहता येईल. या मार्गानेच आपण महावीरांची खऱ्या अर्थाने उपासना करू शकू. कारण इंद्रियांवर विजय मिळवण्याची साधना हीच महावीरांची साधना आहे. धरतीवरील प्राणिमात्रांच्या सुखशांतीसाठी अहिंसेचा नारा बुलंद करायला हवा.
महावीर जयंतीच्या या सुमंगल समयी भगवान महावीर आणि त्यांचं तत्त्वज्ञान यांच्यावरील चर्चेपेक्षा त्या तत्त्वज्ञानाचे आचरण महत्त्वाचं आहे, असं सांगावस वाटतं. आज समाज जीवनात धर्माची वरवर चर्चा भरपूर होते. परंतु अंतरंगात मात्र धर्माचं अस्तित्व शून्य होत चाललं आहे. मंदिरामधून महावीर, राम, कृष्ण यांचं पूजन चाललं आहे. पण जीवनात रावण, कौरव, कंसाच अनुकरण केलं जातंय. महावीरांनी केवळ जैन बांधवांसाठीच नव्हे तर संपूर्ण मानवजातीसाठीच अहिंसा, सत्य, ब्रह्मचर्य, अस्तेय, अपरिग्रह असे पाच सिद्धांत सांगितले. ही पंचतत्त्व केवळ सांगून ते थांबले नाहीत तर त्याचं आचरणही केलं. अहिंसा या पहिल्या तत्त्वाच्या आचरणाची आज सर्वाधिक गरज आहे. अहिंसा ही एखाद्या आईप्रमाणे आहे. तिच्या कुशीत बसावं असं कुणाला वाटतच नाही. कदाचित म्हणूनच निसर्ग मानवावर नाराज झालाय आणि मानव हैराण. एकाचं सुख दुसऱ्याचं दुःख ठरतंय आणि दुसऱ्याचं सुख दुःखासारखं वाटू लागलंय. हीच सर्वात मोठी हिंसा आहे. यापासून मुक्त होण्यासाठी इतरांना कष्टमय ठरणार नाही, असं जीवन जगण्याची गरज आहे.
रक्षकच भक्षक बनू लागले तर प्रलय दूर नाही, हे समजावून सांगायला हवं. पण करणार काय? आम्ही पाषाणहृदयी झालो आहोत. जाणिवा बोथट झाल्या आहेत. महावीर, कृष्ण, राम रहिम, शंकर, नानक यांचे उपासक कोट्यवधींच्या संख्येने जिवंत असताना लाखोंच्या संख्येने पशुधन कापलं जातंय. ज्या गाईचं दूध पिऊन आम्ही तिला आई म्हणतो. त्या गाईलाही प्रभातीच्या समयी. ज्यावेळी देवांवर अभिषेक सुरू असतो तेव्हा कापलं जातंय. पण लक्षात ठेवा जोपर्यंत पशूंची हत्या ही आपल्या हृदयाची पिडा बनत नाही तोपर्यंत पशुहत्या थांबणार नाही. तोपर्यंत कुंडलपूरमध्ये जन्मलेल्या आणि पावापुरीमध्ये मोक्ष प्राप्त केलेल्या भगवान महावीरांचे वंशज म्हणवून घेण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही. आज महावीर जयंतीच्या दिवशी आपण सर्वजण मिळून प्रतिज्ञा करू या, की ‘जिओ और जीने दो’ तत्त्वाचं आम्ही प्राणपणानं पालन करू आणि महावीरांचे सच्चे श्रावक बनु जगाला शांतता, अहिंसा आणि मानवतेची शिकवण देणाऱ्या भगवान श्री महावीरांची दि. १0 एप्रिल २०२५ रोजी (आज) जयंती. त्यानिमित्त त्यांच्या कृतिशील मानवतावादी विचारांचा हा मागोवा
जवानमल फुलचंद जैन
चेअरमन, जीवदया कमिटी जैन सोशल ग्रुप महाराष्ट्र रिजन
बीजेपी जिल्हा उपाध्यक्ष सातारा (व्यापारी आघाडी)
