महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असतील तर आम्हाला आनंदच आहे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

मुंबई: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकारणात जोरदारपणे सुरू आहेत. आधी राज ठाकरे आणि नंतर उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर त्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे संकेत असल्याचीही चर्चा आहे. त्यावर आता भाजपचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मतभेद विसरुन दोघे एकत्र येणार असतील तर आम्हाला आनंदच आहे. पण त्यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर इतकी घाई करू नका, थोडी वाट पाहा असंही सूचकपणे ते म्हणाले.

         राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. त्यावर प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की,  “कुणीही मतभेद विसरून एकत्र येत असतील तर त्यात काही वाईट नाही. दोघे एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे. पण या चर्चा माध्यमांमध्ये आहेत. घाई करू नका, थोडी वाट पाहा. ते दोघे एकत्र आले तर आम्ही त्याचे स्वागत करतो. ऑफर देणारे एक आणि त्याला प्रतिसाद देणारे दुसरे. त्यामुळे मी यावर जास्त काही बोलू शकत नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. फक्त मला असं वाटतं की माध्यमं त्यावर जरा जास्त विचार करत आहेत. त्यामुळे वाट पाहा, दोन्ही ठाकरे एकत्र आले तर आम्ही स्वागत करू. ऑफर देणारे हे, त्यानंतर त्यावर प्रतिसाद देणारे आणि अटी ठेवणारेही तेच. त्यावर मी काय बोलणार? त्यामुळे याबाबत मला जास्त विचारण्यापेक्षा त्यांनाच विचारलं पाहिजे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. दोन ठाकरे एकत्र आले तर ताकद वाढून आगामी मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपसमोर आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. या शक्यतेवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “कुणीही एकत्र येवो. मुंबई महापालिका असो वा कोणतीही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक, भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात एनडीएच विजय मिळवणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!