म्हसवडचे शवविच्छेदन केंद्र बनलंय भूतबंगला
दहिवडी: म्हसवड (ता. माण) येथील शवविच्छेदन केंद्र अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे या परिसरातील मृतांना दहिवडी येथील शासकीय रुग्णालयात दिवसभर ठेवण्यात येत आहे.त्यामुळे नातेवाईकांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे.काही वर्षांपूर्वी माण तालुक्यामध्ये म्हसवड आणि दहिवडी या दोन ठिकाणी शवविच्छेदन केंद्र होते. त्यामुळे अपघाती किंवा शंकास्पद निधन झालेल्या मृताचे विच्छेदन करण्यासाठी जास्त वेळ लागत नसायचा. परंतु गेल्या अनेक वर्षापासून म्हसवड येथील शवविच्छेदन केंद्र बंद अवस्थेत असल्यामुळे म्हसवड परिसरातील मृतांना दहिवडी येथील शासकीय रुग्णालयामध्ये हलविण्यात येते. सध्या तालुक्यामध्ये दहिवडी या एकाच ठिकाणी शवविच्छेदन केंद्र असल्यामुळे व येथे मृताच्या नातेवाईकांना दिवसभर ताटकळत बसावे लागते. मात्र आरोग्य विभाग या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. त्यामुळे नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
माण आणि खटावमध्ये एकच व्यक्ती करतोय मृतदेहाचे विच्छेदन
सध्या दोन्ही तालुक्यासाठी एकच व्यक्ती शवविच्छेदन करत असल्यामुळे त्या व्यक्तीला खटाव तालुक्यामध्ये काम असेल तर माण तालुक्यात येण्यासाठी कधी कधी ८ ते १० तास लागतात. त्यामुळे दहिवडी येथील शासकीय रुग्णालयामध्ये मृतदेह दिवसभर पडून असतात. आणि नातेवाईकही दिवसभर रुग्णालयाच्या परिसरात फिरत असतात. हा नाहक त्रास कमी करायचा असेल तर म्हसवडचे शवविच्छेदन केंद्र सुरू करावे अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.
