महत्त्वाच्या बातम्या

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये मुलींसाठी निवासी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

    रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर येथील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने मुलींसाठी निवासी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन दि.०५ मे २०२५ ते २० मे २०२५ रोजी करण्यात आलेले आहे. या शिबिराचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख उद्घाटक म्हणून अभिजीत पाखरे साहेब (IRS) उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश साळुंखे उपस्थित होते.

 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अभिजीत पाखरे साहेब (IRS) म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासाशिवाय दुसरा पर्याय नाही. जे विद्यार्थी सातत्यपूर्ण प्रयत्न करतात ते विद्यार्थी आयुष्यामध्ये यशस्वी होतात. विद्यार्थ्यांनी आपण अधिकारी होणारच असा आत्मविश्वास मनामध्ये बाळगणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमता लक्षात घेऊन ध्येय ठरवल्यास आयुष्यामध्ये ते लवकर यशस्वी होतात. विद्यार्थ्याने दैनंदिन वाचनातून आणि अनुभवांमधून आपला विचारव्यूह तयार करायला पाहिजे. व्यवस्था बदलायची असेल तर विद्यार्थ्यांनी अगोदर व्यवस्थेमध्ये येणे आवश्यक आहे. यशाचा कळस इच्छाशक्ती जिद्द व सराव या त्रिसूत्रीवर अवलंबून असल्याचे मत अभिजीत पाखरे (IRS) यांनी व्यक्त केले. 

        कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे म्हणाले की, एस. एम. जोशी कॉलेजमधील स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून आजपर्यंत २८२ विद्यार्थी   क्लास वन, क्लास टू या पदावर कार्यरत आहेत. महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा केंद्राची AC अभ्यासिका असून, अत्यंत माफक दरात ती विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांसाठी फ्री मॉक इंटरव्यू घेतले जातात. तसेच विविध पदावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित केला जातो. एस. एम. जोशी कॉलेजमधील स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांप्रमाणेच रयत शिक्षण संस्थेमधील इतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करावी. यासाठी एस. एम. जोशी कॉलेजमध्ये मुलींसाठी निवासी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
कार्यक्रमाच्या प्रसंगी स्पर्धा परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेले आहे. अशा विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा परीक्षा केंद्राचे चेअरमन  डॉ.अतुल चौरे, पाहुण्यांची ओळख समन्वयक प्रा.अजित भोसले, कार्यक्रमाचे आभार प्रा.रेखा कराड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.ज्योती किरवे यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रा. शोभा कोरडे, प्रा.संजय अहिवळे, प्रा. स्वप्निल ढोरे, अनिता शिंदे, प्रा.अविनाश जाधव व रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयातील विद्यार्थीनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!