सेतू कार्यालयातील सर्व्हर डाउनमुळे नागरिक संतप्त
सातारा सेतू कार्यालयातील सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
नागरिकांना शासनाचे विविध सेवांचा लाभ मिळावा, सरकारी दाखले मिळावे, जातीचे दाखले, डोंगरी दाखले यासाठी सेतू विभागाची निर्मिती करण्यात आली. सेतू हा भाग हा महाराष्ट्र शासन व जनतेतील एक दुवा आहे परंतु गेले अनेक महिन्यांपासून सर्वर वारंवार डाऊन होत असल्यामुळे या सेतू मार्फत मिळणाऱ्या सेवांमध्ये अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे नागरिक व शासन यामधील असणारा दुवा कमकुवत आहे. सेतू आस्थापना कर्मचारी हे कंत्राटी कामगार असून सर्वर डाऊन असल्यामुळे यांना नेहमीच जनतेचा रोष ओढवून घ्यावा लागत आहे.
त्यामध्ये जून महिन्यामध्ये विद्यार्थ्यांचे दाखले घेण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सेतू कर्मचारी व नागरिक यांच्यामध्ये या वादावादीचे प्रमाण वाढले आहे. तसेच या ठिकाणी बैठक व्यवस्था पुरेशी नसल्यामुळे नागरिकांना बराच वेळ रांगेमध्ये तात्काळ ताटकळत उभे राहावे लागते. सेतू कार्यालय शेजारी असणाऱ्या झाडाच्या फांद्या पत्र्यावर तुटून पडल्यामुळे पावसाचे पाणी सर्वत्र पसरलेले असते. याठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली नाही. यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.
