प्रा.नेताजी दबडे यांना डिजिटल पेमेंटवरील संशोधनासाठी पीएच.डी पदवी प्रदान
प्रा.नेताजी दबडे यांनी “A Study of Awareness Levels And Consumer Satisfaction Of Digital Payments With Reference To Satara District” या विषयावरती केलेल्या संशोधनासाठी शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर येथून त्यांनी पीएच.डी पदवी प्राप्त केलेली आहे. वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागात रिसर्च फेलो म्हणून कार्य करीत असताना सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील नागरिकांमध्ये डिजिटल पेमेंटविषयी असलेली जागरूकता आणि ग्राहकांचे समाधान याचा त्यांनी सखोल अभ्यास केला.या शोधनिबंधासाठी डॉ.ए.एस.बन्ने (सहयोगी प्राध्यापक,डी.आर.के.कॉलेज ऑफ कॉमर्स,कोल्हापूर) यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.तसेच अधिविभाग प्रमुख प्रा.डॉ.ए.एम.गुरव व डॉ.के.व्ही.मारुलकर यांचेही मोलाचे मार्गदर्शन मिळाले.त्यांना महाराष्ट्र शासनाच्या सारथी संस्थेची फेलोशिप देखील प्राप्त झालेली होती.शिक्षण क्षेत्रात त्यांनी आपले वर्चस्व सिद्ध करीत या आधीच सेट आणि नेट परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केलेल्या आहेत.ही यशप्राप्ती सिद्ध करण्यासाठी शिक्षणाची कोणतीही पायरी गाठणे त्यांना सोपे नव्हते.त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून आपल्या शिक्षणाची वाटचाल सुरू ठेवली.सन २०१६ ते २०२१ या ५ वर्षांच्या कालावधीत त्यांनी माण तालुक्यातील दहिवडी कॉलेज,दहिवडी येथे विपणन,पैसा व वित्तीय रचना या विषयांचे अध्यापन केले.प्रचंड जिद्द,चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावरती त्यांनी हे यश संपादन केलेले आहे.प्रा.नेताजी दबडे यांनी आपल्या या यशाचे सर्व श्रेय मार्गदर्शक प्राध्यापक,अधिविभाग प्रमुख,सारथी संस्था,कुटुंबीय,शिक्षक आणि सर्व मित्रपरिवार यांना दिलेले आहे.या संशोधनाचे निष्कर्ष शासन,बँका,तंत्रज्ञान संस्था आणि धोरणकर्त्यांना डिजिटल पेमेंट प्रणाली अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत असे मत त्यांनी व्यक्त केले.
