हॉर्न वाजवला म्हणून चिखलीत चालकाला मारहाण; तीन जणांवर गुन्हा दाखल
पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून चिखलीमध्ये नवीन प्रकरण समोर आले आहे. हॉर्न वाजवल्यामुळे एकाने चालकाला पिस्तुलाचा धाक दाखवत बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. रात्री दीडच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी अनिकेत चौधरी यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञात तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी एकास चिखली पोलिसांनी जेरबंद केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत चौधरी त्यांच्या मित्रा सोबत त्रिवेणी नगर चौक तळवडे रस्त्यावरून आपल्या राहत्या घरी जात होते. त्यावेळेस चारचाकी गाडीला हॉर्न देऊनही समोरील व्यक्ती पुढे जाऊ देत नव्हता. दोन तीन वेळेस हॉर्न दिल्याने आरोपीने अनिकेतच्या गाडी समोर आपली गाडी आडवी लावली. आरोपींनी गाडी वरून उतरून अनिकेतला धक्काबुक्की केली. तिथेच बाचाबाची झाल्याने जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या डोक्यावर पिस्तूल रोखली व पिस्तूलाच्या मुठीने मारून अनिकेतला जखमी करण्यात आले. तसेच बेदम मारहाण केली व फिर्यादीकडे असलेली परवानाधारक पिस्तूल हिसकावून घेतली. या प्रकरणी अनिकेत चौधरी यांनी चिखली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली असून पोलिसांनी एकास अटक केली आहे. दोन जण फरार झाले असून त्यांचा तपास सुरु आहे.
