शिक्षणात गोंधळ!इंग्रजी शाळेच्या मुख्याध्यापिकेलाच इंग्रजी येत नाही! पालक चिंतेत
दहिवडी: ग्रामीण व मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी शिक्षणाचा दीपस्तंभ ठरलेली माण तालुक्यातील नामांकित संस्थेमधील काही शाखा जाचक फी वसूल करत असले बाबत शिक्षण विभागा मार्फत चौकशी सुरु असतानाच ती संस्था आणखी एका वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. येथील संस्थेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये नुकतीच एका नवीन मुख्याध्यापिकेची नियुक्ती करण्यात आली. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे संबंधित मुख्याध्यापिकेने नुकताच इंग्रजी बोलणे शिकण्यासाठी इंग्लिश स्पीकिंगकोर्स दहिवडी मध्येच पूर्ण केला आहे आणि अजूनही त्या नीट इंग्रजी बोलू शकत नाहीत.या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ग्रामीण भागातील पालकआपल्या मुलांना इंग्रजी शिक्षण मिळावे म्हणून मोठ्या अपेक्षेने आणि आर्थिक कसरत करत या शाळेत प्रवेश घेतात. मात्र आता त्याच शाळेच्या मुख्याध्यापिकेचीच इंग्रजीवर पकड नसल्याचे लक्षात आल्यामुळे पालकांमध्ये तीव्र नाराजी आणि चिंता पसरली आहे. संस्थेचे नाव वापरून पालकांकडून मोठ्या प्रमाणावर फी आकारली जाते, मात्र दर्जेदार इंग्रजी शिक्षण मिळत नसेल तर ही एकप्रकारची फसवणूकच ठरत आहे, असा सवाल काही पालकांनी उपस्थित केला आहे. विद्यार्थ्यांच्या दैनंदिन अभ्यासक्रमात, संप्रेषण क्षमतेत व स्पर्धा परीक्षेच्या तयारीत इंग्रजी भाषेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अशा वेळी शिक्षण व्यवस्थाच दुर्बळ झाली तर ग्रामीण विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.
