कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचा दिनांक २७ रोजी तिसरा वर्धापन दिन….
रविवार दिनांक २७ ऑक्टोबर रोजी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचा तिसरा वर्धापन दिन समारंभ संपन्न होत आहे. पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शंभर वर्षांपूर्वी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. बहुजन समाजाला अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढून प्रकाशाची वाट दाखवायची असेल तर शिक्षण हाच एकमेव उपाय आहे हे त्यांनी ओळखले होते. म्हणून पुढील काळात त्यांनी महाराष्ट्रभरात अनेक शाळा,विद्यालये, महाविद्यालये सुरू करून शिक्षणाची कवाडे बहुजन समाजासाठी खुली केली. कर्मवीरांना त्यांच्या हयातीत ग्रामीण विद्यापीठ स्थापन करून बहुजन समाजासाठी उच्च शिक्षणाची व्यवस्था करायची होती. म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाने विशेष जीआर काढून २७ ऑक्टोबर २०२१ रोजी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाची घोषणा केली. राज्य शासनाचे सार्वजनिक विद्यापीठ म्हणून सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा आणि धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स या तीन घटक महाविद्यालयातून विज्ञान, संगणक शास्त्र ,कला, मानवी विज्ञान बँकिंग व्यवस्थापन इत्यादी ज्ञान शाखांमध्ये ५० च्या वर अभ्यासक्रम शिकविले जातात. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉ.ज्ञानदेव मस्के यांच्या नेतृत्वाखाली आज विद्यापीठाने गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाचे तीन वर्षे यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत.
दिनांक २७ ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू मा. डॉ. डी. टी. शिर्के यांच्यासह विद्यापीठातील अधिष्ठाता, ज्येष्ठ प्राध्यापक, कर्मचारी आणि विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहेत. या कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेचे संघटक मा. डॉ. अनिल पाटील हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सातारा व पंचक्रोशीतील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर तसेच शाळा, महाविद्यालयाचे शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य तसेच विविध स्तरातील मान्यवरांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन मा. कुलगुरू डॉ. ज्ञानदेव मस्के यांनी केले आहे.
विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. डॉ. विजय कुंभार यांच्यासह, प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे, प्राचार्य, डॉ. बी. टी. जाधव, प्राचार्य डॉ. व्ही. के.सावंत आणि विद्यार्थी कल्याण मंडळाच्या अधिष्ठाता प्रा. डॉ. मनीषा पाटील व त्यांचे सहकारी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.
