महत्त्वाच्या बातम्या

दहिवडी-फलटण रस्त्याच्या कामासंदर्भात शेतकऱ्यांच्यात संभ्रमावस्था..!

दहिवडी: दहिवडी-फलटण या द्रुतगती मार्गावरील रस्त्याच्या कामास मंजूरी मिळाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभाग पुणे यांचेकडून रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांना भूसंपादनासाठी नोटीसा देऊन त्यांची भूमीअभिलेख कार्यालयाकडून मोजणीही करण्यात आली आहे. संबंधित ठेकेदाराने कामाचा सर्व्हे करून मोजमाप सुरू केले आहे.मात्र या रस्त्याच्या कामासंदर्भात व भूसंपादनाबाबत रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांच्यात संभ्रमावस्था दिसून येत आहे.राष्ट्रीय महामार्ग विभागाने शेतकऱ्यांचा संभ्रम दूर न केल्यास काम अडवण्याच्या तयारीत शेतकरी दिसून येत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने याबाबत शेतकऱ्यांना स्पष्टीकरण देऊन काम व भूसंपादनासंदर्भात माहिती देणे गरजेचे आहे.

      दहिवडी-फलटण हा रस्ता द्रुतगती महामार्ग होणार याबाबत अनेक वर्षे चर्चा चालू होती. अखेर या रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळाला असून मंजूरी मिळाल्याने रस्त्याचे काम घेतलेल्या संबधित ठेकेदारांनी रस्त्याचा सर्व्हे,मोजमाप करून रस्त्याच्या दोन्ही बाजूंची साफसफाई करण्यास सुरूवात केली आहे.राष्ट्रीय महामार्ग विभागाने ज्या शेतकऱ्यांची जमीन रस्त्यात जाणार आहे त्या रस्त्यालगतच्या अल्प शेतकऱ्यांना भूसंपादनासाठी नोटीसा पाठवून मोजणी करून घेतली आहे तर बहुतांश शेतकऱ्यांच्या जमिनी रस्त्यात जाऊनही त्यांना नोटीसा आल्या नाहित.मात्र त्यांच्या सातबाऱ्यावरून रस्त्यात गेलेले क्षेत्र कमी झाले नाही.जर महामार्ग विभाग म्हणत असेल की त्या रस्त्याचे क्षेत्र आमचेच आहे तर त्याचा काहीतरी पुरावा शेतकऱ्यांना दाखवावा आणि जर त्यांच्याकडे पुरावा नसेल तर त्यांनी आता ज्या क्षेत्रातून रस्ता गेला आहे त्याचाही मोबादला शेतकऱ्यांना देणे गरजेचे आहे असे ही बोलले जात आहे.

     रस्त्याच्या कामासाठी काही ठिकाणी मशीनरी आल्या आहेत पण तेथील शेतकरी विरोध करत आहेत.शेतकऱ्यांच्या समस्या सोडवून रस्ता करणे गरजेचे आहे.अन्यथा शेतकरी काम अडवून कोर्टातही जाण्याच्या तयारीत दिसून येत आहेत. सोशल मिडीयावर या रस्त्याच्या कामाचे लाईनआऊट केलेला प्रोजेक्ट फिरत असून त्यात खूप मोठा रस्ता दिसून येत आहे. यात अनेकांची घरे, दुकाने जाताना दिसून येत आहेत. त्यामुळेही संभ्रम निर्माण झाला आहे. हा रस्ता नेमका किती फूटाचा आहे याबाबतही राष्ट्रीय महामार्ग विभागाने याबाबत योग्य तो खुलासा करून शेतकऱ्यांना माहिती देऊन रस्त्याचे काम करावे असे आवाहनही शेतकऱ्यांकडून केले जात आहे.

 चालू रस्ता आजही शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर

दहिवडी-फलटण हा रस्ता ज्या क्षेत्रातून गेला आहे.ते क्षेत्र आजही संबंधित शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर आहे.ते कमी झालेले नाही.त्यामुळे त्या जागेवर आजही शेतकऱ्यांचा हक्क दिसून येत आहे.त्या क्षेत्रावर महामार्ग हक्क दाखवत असेल तर पुरावे द्यावेत किंवा पुरावे नसतील तर त्या ही क्षेत्राचा मोबदला शेतकऱ्यांना मिळणे गरजेचे आहे.

– रविंद्र बाबर ,अध्यक्ष नेहरू युवा मंडळ बिजवडी ता.माण

      राष्ट्रीय महामार्ग विभागाने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता रस्त्याच्या कामाला सुरूवात केली आहे. वास्तविक आताचा रस्ताही शेतकऱ्यांच्याच सातबाऱ्यावर दिसून येत आहे. अन आता नव्याने रस्त्यासाठी क्षेत्र घेतले जात आहे. याबाबत शेतकऱ्यांना जागृत करून योग्य ती माहिती द्यावी अन्यथा शेतकरी आंदोलन करून कोर्टातही जाऊ शकतात.

– डॉ.अजित दडस , माजी सरपंच पांगरी ता.माण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!