‘सेवा पंधरवडा’ अभियानाला प्रतिसाद द्या; तक्रारी कायमच्या सुटतील: तहसीलदार विकास अहिर
दहिवडी: छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस १७ सप्टेंबर ते महात्मा गांधी जयंती २ आॅक्टोबर दरम्यान ‘सेवा पंधरवडा’ म्हणून राबविण्यात येणार आहे. सर्वांनी मिळून आपण हे अभियान मोठ्या प्रमाणात यशस्वी करुया असे प्रतिपादन तहसीलदार विकास अहिर यांनी केले. दहिवडी महाविद्यालयात आयोजित विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, सरपंच, ग्रामस्थ व माध्यम प्रतिनिधींच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी तहसीलदार विकास अहिर, अपर तहसीलदार मीना बाबर, नायब तहसीलदार श्रीकांत शेंडे व योगिता ढोले, सहाय्यक गटविकास अधिकारी चंद्रकांत खाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रांताधिकारी उज्वला गाडेकर म्हणाल्या, सेवा पंधरवडा हा सर्वसामान्य नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचा असून या अंतर्गत समस्यांची सोडवणूक सुलभतेने करणे शक्य होणार आहे. पाणंद रस्ते विषयक मोहिम हाती घेण्यात आली असून नकाशावर असणारे व वहिवाटीखाली असणारे रस्ते खुले करण्यात येणार आहेत. नकाशावर आहेत पण वहिवाटीखाली नाहीत आणि वहिवाटीखाली आहेत पण नकाशावर नाहीत या रस्त्यांची माहिती घेऊन ते खुले करण्यात येतील तसेच त्यांची नोंद करण्यात येईल. ‘सर्वांसाठी घरे’ या उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
तहसीलदार विकास अहिर म्हणाले, माण तालुक्यात तीन नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यात पोट खराब जमीन आनेवारीत आणणे हा उपक्रम आहे. पुरवठा विभागाने अभिप्रायांसाठी तसेच शिधापत्रिका नवीन तयार करणे, नाव कमी करणे / वाढवणे यासाठी क्यू आर कोड तयार केले आहेत. यासोबतच दाखला मुक्त गाव हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. तरी या सेवा पंधरवडा या उपक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा.
छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर आयोजित करण्यात आलेली गावे व तारीख
दहिवडी – १७ सप्टेंबर,
गोंदवले बुद्रुक -१८ सप्टेंबर,
मलवडी – १९ सप्टेंबर,
आंधळी – २४ सप्टेंबर,
म्हसवड – २३ सप्टेंबर,
मार्डी – २५ सप्टेंबर,
कुकुडवाड – २६ सप्टेंबर,
वर – मलवडी – २९ सप्टेंबर
शिंगणापूर – ३० सप्टेंबर
