बिबट्याची दहशत; शाळांच्या वेळा बदलल्या
पुणे: पुण्यात मागील काही महिन्यांमध्ये बिबट्याचा वावर वाढला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काही लोकांवर, लहान मुलांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या देखील घटना आपल्याला पाहायला मिळाल्या. मागील काही महिन्यात बिबट्याच्या हल्ल्यात तीन लोकांना आपले प्राण गमवावे लागले. या पार्श्वभूमीवर आंबेगाव, खेड, जुन्नर, शिरूर या अतिसंवेदनशील बिबट प्रवण क्षेत्रातील शाळांच्या वेळेत बदल केला आहे. नवीन वेळ ही सकाळी साडेनऊ ते दुपारी चार अशी निश्चित करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील काही विद्यार्थी हे शाळेसाठी पायी ये जा करत असतात. त्यामुळे रस्त्याच्या आजूबाजूला जंगले, झाडे झुडपे व काही असलेला वन भाग, ऊस क्षेत्र, डोंगराळ ठिकाणे आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण वाढले आहे व बिबट्यांच्या हल्ल्याचे प्रमाण देखील वाढले आहे तसेच आता हिवाळी वातावरणामुळे लवकर अंधार पडतो त्यामुळे विद्यार्थ्यांची तसेच नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लवकर घरी पोहोचणे अंधारापूर्वीच घरी पोहोचणे आवश्यक असल्याने शाळांच्या वेळेत बदल करून व्यवस्थापन समिती व शाळा समितीची मंजुरी घेऊन करण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे परिपत्रकात नमूद केले आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी जुन्नर बिबट प्रमाण क्षेत्रातील शिरूर, जुन्नर, आंबेगाव, खेड या तालुक्यातील बिबट्याच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमी वरती बिबट प्रवणक्षेत्रात असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत उपाययोजना करण्यासंबंधी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी यांना परिपत्रक काढून शाळांना सुचित करण्याचे निर्देश दिले आहेत.
