महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात ‘स्पा’च्या नावाखाली सुरू असलेल्या काळ्या धंद्याचा पर्दाफाश; वाघोलीत गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ५ तरुणींची सुटका

पुणे: मसाज आणि स्पा सेंटरच्या नावाखाली छुप्या पद्धतीने चालणाऱ्या देहविक्रीच्या अड्ड्यांवर पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला आहे. वाघोली परिसरातील एका स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. या धडक कारवाईत पोलिसांनी ५ पीडित तरुणींची नरकयातनेतून सुटका केली असून, स्पा चालवणाऱ्या मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

पुणे शहर पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाला (Anti-Human Trafficking Cell) वाघोली भागात स्पाच्या नावाखाली मुलींकडून चुकीची कामे करून घेतली जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. बकोरी फाटा येथील ‘रेम्बो क्रॉसेस’ इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या ‘९ सेन्सेस स्पा’ (9 Senses Spa) मध्ये हा सगळा काळा धंदा सुरू होता.

case pune photo

माहिती मिळताच पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या पथकाने कायदेशीर रणनीती आखली. या स्पा सेंटरमध्ये प्रथम एक बनावट ग्राहक (Dummy Customer) पाठवून तिथे सुरू असलेल्या गैरकृत्यांची खातरजमा करण्यात आली. तिथून सिग्नल मिळताच पोलिसांनी ‘९ सेन्सेस स्पा’वर अचानक छापा टाकला. या अनपेक्षित कारवाईमुळे तिथे उपस्थित असलेल्यांची एकच पळापळ झाली. पोलिसांनी घटनास्थळावरून ५ पीडित महिलांची सुटका केली आणि त्यांची सुरक्षित ठिकाणी रवानगी केली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत स्पा चालक महावीर सुदाम ससाने (वय २९, रा. साईनाथनगर, पेरणे फाटा, ता. हवेली) याला अटक केली आहे. त्याचा आणखी एक साथीदार या गुन्ह्यात सामील असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या दोन्ही आरोपींविरुद्ध वाघोली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १४३ (१) (३), ३ (५) आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा १९५६ च्या कलम ३, ४, ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे शहराचे पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त श्री. संजय दराडे आणि अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती तेजस्वीनी सातपुते यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली ही कारवाई पूर्ण करण्यात आली. गुन्हे शाखेचे पोलीस उप-आयुक्त श्री. गौहर हसन, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. विजय कुंभार यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक छगन कापसे, पोलीस अंमलदार भिवरकर, आंधळे, केदार, जाधव, रसाळ, कोंडे तसेच महिला अंमलदार कंक आणि खेडेकर यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!