महत्त्वाच्या बातम्या

मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल्स की ‘लूटमारीची’ दुकाने? ‘पांढऱ्या कपड्यातील देवदूतांच्या’ वाढत्या व्यावसायिकतेवर जनतेचा संतप्त सवाल!

प्रवीण राजे, दहिवडी:360_F_868358237_CZM7kskoyjIsnrgCjDuqf7DsxI7UanY5(दि. २९):

ज्या डॉक्टरांना समाजात देवाचे रूप मानले जाते, तेच आता पैशाच्या हव्यासापोटी सर्वसामान्यांचे खिसे कापू लागले आहेत का? असा संतप्त प्रश्न सध्या जनतेमधून उपस्थित केला जात आहे. वैद्यकीय क्षेत्रातील काही प्रामाणिक अपवाद वगळता, सध्या वाढलेली अनैतिक व्यावसायिकता आणि मूल्यांचा ऱ्हास यामुळे रुग्णांना भीती दाखवून लाखो रुपये उकळण्याचा एक नवा ‘धंदा’ जोमाने सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे.

​नुकतीच वैद्यकीय पदवी घेऊन बाहेर पडलेले आणि पुरेसा अनुभव नसलेले अनेक नवखे डॉक्टर्स सुरुवातीलाच कोट्यवधींची गुंतवणूक करून भव्य, पाच-पाच मजली मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल्स उभी करत आहेत. मात्र, या इमारतींचा अवाढव्य खर्च, कर्मचाऱ्यांचे पगार आणि स्वतःचा नफा मिळवण्यासाठी रुग्णांना नाहक वेठीस धरले जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे, शहरातील अनेक कॉर्पोरेट रुग्णालयांमध्ये दररोज ठराविक संख्येने रुग्ण ‘अ‍ॅडमिट’ करण्याचे सक्तीचे ‘टार्गेट’ कर्मचाऱ्यांना दिले जात असल्याच्या चर्चाही आता उघडपणे ऐकायला मिळत आहेत.

​चाचण्यांचा भडिमार आणि कमिशनचा मलिदा: वसुलीचे ‘नियोजित’ चक्र

​या रुग्णालयांकडून केली जाणारी आर्थिक लूट अत्यंत पद्धतशीरपणे चालते. एखादा रुग्ण अगदी सामान्य सर्दी, खोकला किंवा तापाचे लक्षण घेऊन गेला, तरी उपचाराचा परिणाम पाहण्याची सोशिकता या डॉक्टरांकडे उरलेली नाही. उलट, “तुम आजार गंभीर आहे, तातडीने तपासण्या केल्या नाहीत तर जीवाला धोका होऊ शकतो,” अशी भीती रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मनात भरवली जाते.

​रुग्ण एकदा का घाबरून अ‍ॅडमिट झाला, की मग गरज नसतानाही रक्ताच्या विविध चाचण्या, एमआरआय (MRI), सीटी स्कॅन (CT Scan) यांसारख्या महागड्या तपासण्यांचा सपाटा लावला जातो. यामागचे मुख्य कारण म्हणजे, खाजगी लॅब चालकांकडून डॉक्टरांना मिळणारे ठरलेले भरमसाठ कमिशन!

​वैद्यकीय क्षेत्राची माहिती असणारे सुज्ञ नागरिक कदाचित या जाळ्यातून वाचू शकतील; मात्र ग्रामीण भागातील गरीब शेतकरी, कष्टकरी वर्ग जो डॉक्टरांवर अंधश्रद्धा ठेवतो, तो या भीतीला बळी पडतो. आपल्या माणसाचा जीव वाचवण्यासाठी हा गरीब वर्ग कर्ज काढून किंवा उसने-पासने करून डॉक्टरांचे खिसे भरतो. ही त्यांच्या विश्वासाची क्रूर थट्टा आहे.

​सर्व मार्गांनी रुग्णाची लूट केल्यानंतर, शेवटी “आता सर्व रिपोर्ट नॉर्मल आले आहेत,” असे सांगून डिस्चार्ज दिला जातो. हातात लाखो रुपयांचे गलेलठ्ठ बिल पडल्यावर रुग्ण हवालदिल होतो. अशा वेळी बिलातून केवळ १००-२०० रुपये कमी करायचे आणि “आम्ही तुम्हाला सवलत दिली,” असे दाखवून रुग्णावर उपकाराचे ओझे लादण्याची एक नवी लाजीरवाणी पद्धत रूढ झाली आहे.

​…तरच ‘धन्वंतरी’ची शपथ सार्थ ठरेल!

​भव्य इमारतींचे बँक हप्ते आणि स्वतःची पैशाची भूक भागवण्यासाठी रुग्णांना लुबाडणाऱ्या या पांढरपेशा लुटारूंना त्यांच्या कर्तव्याची जाणीव कधी होणार? पैशाचा हा हावरेपणा सोडून, पदवी घेताना ‘धन्वंतरी’ देवतेसमोर घेतलेली शपथ हे डॉक्टर्स कधी पाळणार? हाच आजचा मोठा प्रश्न आहे. या नफेखोरीच्या विरोधात आता जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत असून, प्रशासनाने यावर कडक लगाम लावावा अशी मागणी होत आहे.

​ प्रशासनाचा कडक इशारा: थेट परवाने रद्द करणार!

​”वैद्यकीय क्षेत्र हे रुग्णसेवेसाठी आहे, त्याचा व्यापारीकरणासाठी किंवा रुग्णांना लुबाडण्यासाठी वापर करणे अत्यंत निंदनीय आहे. केवळ स्वतःचा आर्थिक फायदा किंवा हॉस्पिटलचे हप्ते फेडण्यासाठी रुग्णांवर विनाकारण चाचण्यांचा भडिमार करणे किंवा त्यांना धाक दाखवून अ‍ॅडमिट करून घेणे, हा ‘बॉम्बे नर्सिंग होम अ‍ॅक्ट’ आणि वैद्यकीय नैतिकतेचा (Medical Ethics) थेट भंग आहे.

​साताऱ्यातील कोणत्याही खाजगी रुग्णालयाकडून किंवा नवख्या डॉक्टरांकडून अशा प्रकारे टार्गेट ठरवून लूटमार केली जात असेल, तर रुग्णांच्या नातेवाईकांनी न घाबरता थेट जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे लेखी तक्रार नोंदवावी. अशा प्रकरणांच्या चौकशीसाठी आम्ही एक विशेष समिती गठीत करत आहोत. ज्या रुग्णालयांमध्ये अनावश्यक चाचण्या आणि कमिशनखोरीचे प्रकार सिद्ध होतील, त्यांचे परवाने (Registrations) तात्काळ रद्द केले जातील आणि संबंधित डॉक्टरांवर कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात येतील. डॉक्टरांनी धन्वंतरीची शपथ स्मरून रुग्णांचे प्राण आणि खिसा दोन्ही सुरक्षित ठेवावे, हेच त्यांच्या हिताचे ठरेल.”

​— डॉ. राहुल जाधव > (जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!