महत्त्वाच्या बातम्या

बळीराजाला दिलासा! महाराष्ट्रात पावसाचे पुनरागमन, २० जुलैपासून जोर वाढणार; हवामान विभागाचा १२ राज्यांना हाय अलर्ट

मुंबई:

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे चिंतेत असलेल्या शेतकरी वर्गासाठी अखेर एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये गेल्या २४ तासांत पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली असून, यामुळे कोरड्या पडत चाललेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार, राज्यातील हा पावसाचा जोर येत्या २० जुलैपासून अधिक तीव्र होणार आहे. विशेषतः कोकण, विदर्भ आणि मराठवाड्याच्या पट्ट्यात पावसाची मोठी बॅटिंग पाहायला मिळणार आहे. आगामी २० तारखेपासून मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नाशिक, नांदेड आणि बीड या प्रमुख जिल्ह्यांसह राज्यातील एकूण १३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान खात्याने स्थानिक प्रशासनाला सर्तक राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

देशांतर्गत हवामानाचा विचार केला तर हवामान विभागाने देशातील इतर १२ राज्यांसाठी अतिमुसळधार पावसाचा तीव्र इशारा म्हणजेच ‘हाय अलर्ट‘ जारी केला आहे. १७ जुलै रोजी उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, झारखंड, पश्चिम बंगाल, पंजाब, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळू शकतो. या काळात पूर्व भारतातील काही राज्यांमध्ये अतिवृष्टीचा धोका वर्तवण्यात आला असून, ताशी ६० ते ७० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. या वेगवान वाऱ्यांमुळे मैदानी भागात मोठे वृक्ष कोलमडून पडण्याची आणि डोंगराळ राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भूस्खलन (Landslides) होण्याचा धोका निर्माण झाला आहे. नागरिकांनी सुरक्षेची काळजी घ्यावी, तसेच समुद्र खवळलेला राहणार असल्याने मच्छिमारांनी कोणत्याही परिस्थितीत समुद्रात जाऊ नये, असा कडक इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!