साताऱ्यातील वडूज येथील लाच लुचपत प्रकरणात तहसीलदार बाई मानें सह 3 तलाठ्यांचा समावेश
सातारा जिल्ह्यातील वडूज येथे तहसीलदार कार्यालयातील तीन तलाठ्यांवर लाच घेण्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. एक वर्षांपूर्वी वडूज येथील महसूल सहाय्यक प्रवीण नांगरे यांच्यावर 55 हजाराची लाच घेतल्याचा गुन्हा दाखल होता.त्याचा अधिक तपास केल्यानंतर त्यामध्ये आणखी तीन तलाठ्यांचा समावेश असून विद्यमान तहसीलदार बाई माने यांचाही सहभाग आहे. याबाबतची अधिक माहिती सातारा एसीबी चे पोलीस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांनी दिली. वडूज तहसीलदार श्रीमती बाई सर्जेराव माने,औंध तलाठी धनंजय पांडुरंग तडावळेकर, भोसरे तलाठी गणेश मोहन राजमाने, वडूज तहसील मधील महसूल सहाय्यक रवींद्र आनंदा कांबळे अशी नवीन आरोपींची नावे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एसीबी कारवाईने महसूल विभाग हादरून गेलेे आहे.गुन्हे दाखल झालेल्या आरोपींच्या मूळ गुन्ह्यातील कलमात वाढ केली आहे.
एसीबी चे पोलीस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार या लाच प्रकरणातील तक्रारदाराचे दोन डंपर वडूज महसूल विभागाने पकडले होते. हे डंपर सोडवण्यासाठी प्रवीण नांगरे यांनी 55 हजार रुपयांची मागणी केली. ही मागणी 21 नोव्हेंबर 2023 रोजी केली होती.दुसऱ्या दिवशी नांगरे यांनी त्यांच्या ब्रीझ कार मध्ये पैसे ठेवण्यास सांगितले व त्याच वेळेस सातारा एसीबीने सापळा रुचून दिनांक 22 रोजी नांगरे यांना अटक केले. या प्रकरणाचा पुढील तपास पुणे एसीबी कार्यालयाच्या अप्पर पोलीस अधीक्षक शितल जान्हवे- खराडे यांनी सुरू केला व या प्रकरणात आणखी चार जणांचा समावेश असल्याची माहिती समोर आली.
