महत्त्वाच्या बातम्या

ट्रम्प सरकारचा मोठा निर्णय! अमेरिकेतून तब्बल १८ हजार बेकायदेशीर भारतीयांची होणार हकालपट्टी; लष्करी विमानांचा होणार वापर

वॉशिंग्टन / नवी दिल्ली:  

अमेरिकेत बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांवर डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या धडक मोहिमेअंतर्गत सुमारे १८ हजार बेकायदेशीर भारतीय नागरिकांना अमेरिकेतून बाहेर काढून पुन्हा भारतात डिपोर्ट करण्याची एक मोठी योजना आखण्यात आली आहे. ट्रम्प यांनी पुन्हा सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर बेकायदेशीर इमिग्रंट्सविरोधात अत्यंत कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, यामुळे अमेरिकेतील हजारो भारतीय कुटुंबांचे जीवन धोक्यात आले आहे. या मोहिमेत लोकांना थेट ताब्यात घेऊन मायदेशी धाडण्यासाठी पुन्हा एकदा अमेरिकन सैन्याच्या विशेष विमानांचा वापर करण्याची पूर्ण तयारी प्रशासनाने केली आहे.

अमेरिकेतील न्यूयॉर्क, टेक्सास, कॅलिफोर्निया आणि न्यूजर्सी यांसारख्या प्रमुख आणि दाट लोकवस्तीच्या शहरांमध्ये राहणाऱ्या भारतीयांवर या कारवाईचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (ICE) च्या विशेष तुकड्यांकडून विविध ठिकाणी सतत छापे मारले जात असून, योग्य कागदपत्रे नसलेल्या भारतीयांना थेट ताब्यात घेतले जात आहे. विशेष म्हणजे, अशा नागरिकांना न्यायालयात अपील करण्याची, कायदेशीर सुनावणी मिळवण्याची किंवा स्वतःचा वकील करण्याची कोणतीही संधी दिली जात नाही. पकडण्यात आलेल्या लोकांना ठेवण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने तब्बल १६,५०० कोटी रुपये खर्च करून एल पासो आणि कॅलिफोर्निया येथे विशाल वेअरहाऊस खरेदी केले असून त्यांचे रूपांतर अत्याधुनिक डिटेंशन सेंटरमध्ये केले आहे. या केंद्रांमध्ये सध्या सुमारे १२ हजार भारतीयांना ठेवण्यात आले असून तेथे त्यांच्यावर अत्याचार होत असल्याच्या गंभीर तक्रारीही समोर येत आहेत.

अमेरिकेतील कायदेतज्ज्ञ आणि ३० वर्षांचा अनुभव असलेले न्यूयॉर्कचे इमिग्रेशन अटर्नी ग्रेग सिस्किंड यांनी व्यक्त केलेल्या माहितीनुसार, यापूर्वी अमेरिकेत कोणत्याही विनाकागदपत्र राहणाऱ्या नागरिकाला आपली बाजू मांडण्याचा कायदेशीर अधिकार मिळायचामात्र आता आयसीईच्या धाडींनंतर लोकांना कोणतीही संधी न देता थेट डिटेंशन सेंटरमध्ये डांबले जात आहे. अमेरिकेत प्रत्येक राज्याचे मानवाधिकारांचे स्वतंत्र कायदे असतानाही आयसीई संपूर्ण देशात एकाधिकारशाहीने कारवाई करत आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, वर्ष २०२५ मध्ये अमेरिकेने ३,५६७ भारतीयांना डिपोर्ट केले होते, तर चालू वर्ष २०२६ मध्ये जून महिन्यापर्यंत १,०७६ भारतीयांना परत पाठवण्यात आले आहे.

यापूर्वी ५ फेब्रुवारी २०२५ रोजी अमेरिकेने लष्कराच्या विशेष विमानाने १०४ भारतीयांना अमृतसर येथे पाठवले होते. त्या वेळी अनेक भारतीयांच्या हातात आणि पायात बेड्या ठोकल्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर भारतभरातून प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला होता आणि संसदेतही विरोधी पक्षांनी सरकारला यावरून चांगलेच धारेवर धरले होते. आता पुन्हा एकदा तब्बल १८ हजार भारतीयांना त्याच पद्धतीने डिपोर्ट करण्याची योजना समोर आल्याने अमेरिकेतील अनिवासी भारतीय आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!