महत्त्वाच्या बातम्या

राजधानीत आंदोलनाचा उद्रेक; पोलिस कारवाईनंतर राहुल गांधी व प्रियंका गांधी ताब्यात

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत ‘संसद मार्च‘ दरम्यान काल विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस लाठीचार्जचा पडसाद आता राजकीय वर्तुळात अत्यंत तीव्रतेने उमटू लागले आहेत. या हिंसक घटनेच्या निषेधार्थ आणि आंदोलक विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी आज लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले. पंतप्रधान निवासाबाहेर काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने परिसरात मोठा राडा झाला. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून पोलिसांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांना आणि आंदोलक विद्यार्थ्यांना तात्काळ ताब्यात घेतले. काल विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीमारानंतर संपूर्ण देशातून संतापाची लाट उसळली असून विरोधी पक्ष या मुद्द्यावरून कमालीचा आक्रमक झाला आहे.

दुसरीकडे, जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) बॅनरखाली सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी हजेरी लावली. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी कालच्या लाठीमारात जखमी झालेल्या आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. तसेच विद्यार्थ्यांवर झालेल्या या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. पोलिसांच्या या कारवाईनंतरही आंदोलकांनी आपले आंदोलन मागे न घेता ते पुढेही सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

दरम्यान, संसदेचे अधिवेशन सुरू असतानाच आंदोलकांनी परवानगी नसतानाही संसदेच्या दिशेने कूच केल्यामुळे दिल्लीतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव संसद परिसरातील अनेक प्रमुख मेट्रो स्थानके तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली असून, संपूर्ण भागात मोठ्या प्रमाणावर पोलीस आणि निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. या आंदोलनामुळे राजधानीतील वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण पडला असून पोलीस प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!