महत्त्वाच्या बातम्या

मोदी सरकारविरोधात शिवसेना मैदानात! उद्धव ठाकरे उद्या जंतर-मंतरवरून काय बोलणार?

मुंबई: राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाला आता तीव्र राजकीय वळण मिळाले आहे. आंदोलक तरुणांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमारानंतर देशभरातून संतापाची लाट उसळली असून विरोधी पक्षांनी या मुद्द्यावर केंद्र सरकारविरोधात जोरदार मोर्चा उघडला आहे. राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यानंतर आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील उद्या जंतर-मंतरवर जाऊन आंदोलक तरुणांची भेट घेणार आहेत. या वेळी आमदार आदित्य ठाकरे हेदेखील त्यांच्यासोबत उपस्थित राहणार असून, उद्धव ठाकरे यांच्या या दिल्ली दौऱ्यामुळे आणि तेथे ते काय भूमिका मांडणार याकडे संपूर्ण देशा राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून जंतर-मंतरवर तरुण आंदोलकांनी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र निदर्शने सुरू केली आहेत. शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या या आंदोलनावर पोलिसांनी बळाचा वापर करत लाठीचार्ज केल्याने हे आंदोलन अधिकच चिघळले आहे. या घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रातही उमटले असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि खासदार अरविंद सावंत यांनी मंगळवारी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. या वेळी संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधत हे सरकार पूर्णपणे विद्यार्थीविरोधी असल्याचा गंभीर आरोप केला होता.

संजय राऊत यांच्या भेटीनंतर आता थेट उद्धव ठाकरे स्वतः जंतर-मंतरवर दाखल होणार असल्याने दिल्लीतील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यानंतर आता शिवसेनेनेही या आंदोलनात थेट उडी घेतल्याने केंद्र सरकारवरील दबाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. उद्या जंतर-मंतरवरून उद्धव ठाकरे मोदी सरकारवर काय हल्लाबोल करतात, याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!