महत्त्वाच्या बातम्या

विद्यार्थी हित की सत्ताकारण? जंतर-मंतरवरील ‘सीजेपी’ आंदोलन भरकटल्याचा आरोप

नवी दिल्ली: राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात ‘नीट‘ (NEET) परीक्षा पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरोधात सुरू झालेल्या विद्यार्थी आंदोलनाला आता राजकीय वळण मिळाले असून राजकीय पक्षांमध्ये तीव्र आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ‘कॉकरोच जनता पार्टी‘ (CJP) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या आंदोलनाने जंतर-मंतरवरून थेट पंतप्रधान निवासाकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर, हे आंदोलन विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी राहण्याऐवजी केवळ सत्ताकारणाचा आणि राजकीय स्वार्थाचा मोहरा बनल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांऐवजी राजकीय पक्षांच्या हस्तक्षेपामुळे मूळ उद्दिष्ट बाजूला पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्यांसाठी सुरू झालेल्या या आंदोलनात आम आदमी पार्टी (AAP) आणि काँग्रेससारख्या विरोधी पक्षांनी सहभाग नोंदवत त्याला वेगळे वळण दिल्याचा दावा केला जात आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा मुद्दा पुढे करून राजकीय पक्ष आपली राजकीय पोळी भाजून घेत असल्याचा आरोप सत्ताधारी वर्गाकडून केला जात आहे. आंदोलकांनी थेट संसदेकडे आणि पंतप्रधान निवासाकडे कूच केल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून, यामुळे मूळ आंदोलकांचे आणि सामान्य विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे मत विश्लेषक व्यक्त करत आहेत.

लोकशाहीत विरोध आणि आंदोलन करणे हा घटनात्मक अधिकार असला, तरी जेव्हा विद्यार्थ्यांच्या भावनांचा वापर करून सत्ता हस्तगत करण्याचे किंवा सरकारला घेरण्याचे राजकारण केले जाते, तेव्हा लोकशाहीची मूल्ये कमकुवत होतात. मूळ प्रश्नांवर तोडगा काढण्याऐवजी विरोधी पक्षांनी या आंदोलनाला आपल्या राजकारणाचे केंद्र बनवल्यामुळे जंतर-मंतरवरील हे आंदोलन आपल्या मुख्य ध्येयापासून भरकटल्याची टीका आता विविध स्तरांतून होत आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक पक्ष आपापले राजकीय पत्ते चाचपडून पाहत आहे. जंतर-मंतरवरील आंदोलनात आम आदमी पार्टी आणि काँग्रेसच्या नेत्यांची आक्रमक सक्रियता ही केवळ विद्यार्थ्यांचा मुद्दा मांडण्यापुरती मर्यादित नसून, त्यामागे उत्तर प्रदेशातील संभाव्य राजकीय युतीचे सूतोवाच असल्याचे बोलले जात आहे. काही अहवालांनुसार, समाजवादी पक्ष आणि आम आदमी पार्टी यांच्यात आगामी निवडणुकीसाठी पडद्यामागून हालचाली आणि संभाव्य कराराबाबत चर्चा सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.

विरोधी पक्षांच्या या सर्व हालचालींमुळे उत्तर प्रदेशातील सत्ताधारी भाजपविरोधात एक भक्कम आघाडी उभारण्याचा प्रयत्न सुरू असला, तरी पक्षांमधील जागावाटप आणि मुख्य नेतृत्वाचा मुद्दा अजूनही कळीचा ठरत आहे. काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि आम आदमी पार्टी यांच्यातील ही चढाओध आणि युतीची गणिते २०२७ च्या यूपी निवडणुकीत कोणते नवीन राजकीय वळण घेतात, याकडे संपूर्ण देशाच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!