महत्त्वाच्या बातम्या

BMC Recruitment 2026: मुंबई महापालिकेत ११५ जागांवर भरती! १० वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी

मुंबई: मुंबईत वैद्यकीय क्षेत्रात आणि महापालिकेच्या आरोग्य विभागात काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत असलेल्या राजावाडी रुग्णालयाने विविध ११५ रिक्त पदांसाठी अधिकृत नोकरभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये प्रयोगशाळा परिचर, आया, रुम अटेंडंट, सफाईगार, मदतनीस, रुग्णवाहिका परिचर, माळी, शिंपी आणि इलेक्ट्रीशियन अशा अनेक प्रकारच्या चतुर्थ श्रेणी व तांत्रिक पदांचा समावेश आहे. विशेष म्हणजे १० वी उत्तीर्ण असणारे उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरणार असून, अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

या भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या आणि निवड होणाऱ्या उमेदवारांना दरमहा १५,००० रुपये ते १८,००० रुपये यादरम्यान मानधन दिले जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचे वय २२ ते २५ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी आपले अर्ज पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत. यासाठी अर्जाचा विहित नमुना भरून त्यासोबत सर्व शैक्षणिक कागदपत्रे, वयाचा पुरावा, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणि आवश्यक प्रमाणपत्रांच्या स्व-साक्षांकित (Self-attested) प्रती जोडणे बंधनकारक आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ‘आस्थापना विभाग, पहिला मजला, डी-विंग, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. रुस्तम नरसी कूपर रुग्णालय‘ या दिलेल्या पत्त्यावर प्रत्यक्ष किंवा टपालद्वारे पाठवायचे आहेत. अर्ज प्रक्रिया २२ जुलै २०२६ पासून सुरू झाली असून, ३० जुलै २०२६ ही अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख असणार आहे. मुंबईत सरकारी सेवेत रुजू होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या १० वी पास उमेदवारांनी वेळेत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!