महत्त्वाच्या बातम्या

२६ जुलैला जंतर-मंतरवर आंदोलकांना चोपणार!” हिंदू रक्षा दलाची उघड धमकी; दिल्लीत खळबळ

नवी दिल्ली: नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनाला आता हिंसक वळण लागण्याची चिन्हं दिसत आहेत. एका हिंदुत्ववादी संघटनेच्या नेत्याने या आंदोलकांवर थेट मारहाणीची घोषणा केल्यामुळे दिल्लीत मोठा तणाव निर्माण झाला आहे. गाझियाबाद येथील ‘हिंदू रक्षा दल‘ या संघटनेचे अध्यक्ष पिंकी चौधरी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ जारी करत २६ जुलै रोजी दुपारी १२ वाजता जंतर-मंतरवर जाऊन आंदोलकांना चोप देण्याची उघड धमकी दिली आहे.

आपल्या वादग्रस्त विधानांसाठी नेहमीच चर्चेत असणाऱ्या पिंकी चौधरी यांनी सीजेपी समर्थक आणि आंदोलकांवर गंभीर आरोप केले आहेत. जंतर-मंतरवर जमलेले आंदोलक सनातनविरोधी असून ते भारताची जगभरात बदनामी करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. आंदोलनाच्या नावाखाली अश्लीलता पसरवली जात असून भारतीय सैन्य आणि सनातन धर्माविरुद्ध चिथावणीखोर वक्तव्ये केली जात असल्याचा आरोपही चौधरी यांनी केला. या आंदोलनात देशविरोधी विचारांचे लोक सहभागी असल्याचा दावा करत, देशाची प्रतिष्ठा जपण्यासाठी आपण पूर्ण ताकदीने त्यांचा प्रतिकार करू आणि आंदोलन उधळून लावू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

एवढेच नाही तर या आंदोलनाला पाठिंबा देणारे विरोधी पक्षाचे नेते आणि आझाद समाज पक्षाचे खासदार चंद्रशेखर आझाद यांनाही पिंकी चौधरी यांनी अप्रत्यक्षपणे धमकी दिली आहे. या थेट धमकीच्या व्हिडिओमुळे दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून येत्या २६ जुलैला जंतर-मंतरवर काय घडणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या धमकीनंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून दिल्ली पोलिसांकडून खबरदारीचे उपाय योजले जात असून जंतर-मंतर परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात येत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!