महत्त्वाच्या बातम्या

एआय तंत्रज्ञानाचा गैरवापर करून केंद्रीय मंत्र्यांचा बनावट व्हिडिओ प्रसारित! चाणक्यपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नवी दिल्ली: कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा गैरवापर करून देशातील बड्या नेत्यांना लक्ष्य करण्याचे प्रकार सातत्याने समोर येत असून, आता केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचा एक बनावट आणि डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. संसदेबाहेर माध्यमांशी बोलताना पीयूष गोयल यांनी दिलेले मूळ वक्तव्य एडिट करून त्यामध्ये छेडछाड करण्यात आली आणि एआयच्या मदतीने एक अत्यंत खोटा व दिशाभूल करणारा व्हिडिओ तयार करण्यात आला. हा प्रकार लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी आणि समाजात चुकीचा संदेश पसरवण्यासाठी काही समाजकंटकांनी केल्याचा आरोप करत केंद्रीय मंत्र्यांनी याविरोधात कडक पावले उचलली आहेत.

या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी २५ जुलै २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी नवी दिल्लीतील चाणक्यपुरी पोलीस ठाण्यात अधिकृतपणे फिर्याद दिली असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोटा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल करणारे आणि अशा प्रकारच्या बनावट तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर किंवा सोशल मीडियावर येणाऱ्या अशा अविश्वसनीय आणि पडताळणी न केलेल्या माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. भारतातील सुजाण तरुण अशा प्रकारच्या फेक एआय व्हिडिओंच्या भूलथापांना आणि षडयंत्रांना कधीही बळी पडणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

व्हायरल झालेल्या या बनावट व्हिडिओमध्ये केंद्रीय मंत्र्यांच्या तोंडी काही आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वाक्ये घालायचा प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सायबर सेल आणि दिल्ली पोलिसांकडून केला जात असून, हा बनावट व्हिडिओ नेमका कुठून आणि कोणी व्हायरल केला, याचा शोध घेतला जात आहे. AI च्या गैरवापरामुळे राजकीय वर्तुळात आणि सामान्य नागरिकांमध्ये सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून, अशा प्रकारच्या फेक कंटेटवर कडक कायदेशीर नियंत्रण आणण्याची मागणी जोर धरत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!