इन्फोसिसचे सह-संस्थापक ते डिजिटल क्रांतीचे शिल्पकार; परीक्षा सुधारणांसाठी मोदी सरकारकडून नंदन निलेकणींची निवड
नवी दिल्ली: देशभरात परीक्षांच्या पारदर्शकतेबाबत आणि प्रश्नपत्रिका लीक होण्याच्या घटनांवरून निर्माण झालेला वाद पाहता, केंद्र सरकारने परीक्षा प्रणालीमध्ये अमुूलाग्र आणि दूरगामी सुधारणा करण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. देशातील परीक्षा पद्धती अधिक विश्वासार्ह, पारदर्शक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित बनवण्याच्या उद्देशाने प्रसिद्ध उद्योगपती तथा तंत्रज्ञानतज्ज्ञ नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्च-स्तरीय कार्यगटाची (टास्क फोर्स) स्थापना केली जाणार असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. रविवारी एका विशेष व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून ही घोषणा करण्यात आली असून, यामुळे आगामी काळात देशातील संपूर्ण शिक्षण आणि परीक्षा व्यवस्थेत मोठे बदल पाहायला मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर जारी केलेल्या संदेशात स्पष्ट केले की, परीक्षा प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्यासाठी आणि तरुणांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. यापूर्वीच जलदगती न्यायालयांची स्थापना करण्यात आली असून कठोर तरतुदी असलेले नवीन कायदे आणण्यासाठी संसदेत पावले उचलली जात आहेत. मात्र, केवळ शिक्षेच्या तरतुदींवर न थांबता भविष्याचा वेध घेणारी एक अत्यंत सुरक्षित, अत्याधुनिक आणि तंत्रज्ञानयुक्त परीक्षा प्रणाली निर्माण करणे काळाची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) संपूर्ण परीक्षा प्रणालीमध्ये आमूलाग्र सुधारणा करण्यासाठी विविध क्षेत्रांतील नामवंत तज्ज्ञांचा समावेश असलेला एक बहु-विद्याशाखीय उच्च-स्तरीय कार्यगट स्थापन करण्यात आला आहे, ज्याचे नेतृत्व देशातील दिग्गज तंत्रज्ञानतज्ज्ञ नंदन निलेकणी यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.
या उच्च-स्तरीय टास्क फोर्सचे नेतृत्व करणाऱ्या नंदन निलेकणी यांच्याबद्दल बोलायचे तर, ते भारतीय तंत्रज्ञान आणि उद्योग जगतातील एक अत्यंत प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व आहेत. ते जागतिक पातळीवर ख्यातीप्राप्त असणाऱ्या ‘इन्फोसिस‘ (Infosys) या अग्रगण्य माहिती तंत्रज्ञान कंपनीचे सह-संस्थापक आहेत. याशिवाय, भारताची डिजिटल ओळख निर्माण करणाऱ्या आणि देशातील प्रत्येक नागरिकाला डिजिटल प्रणालीशी जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाचे (UIDAI) अध्यक्ष म्हणून त्यांनी यशस्वी धुरा सांभाळली असून, त्यांना भारतातील डिजिटल ओळख प्रणालीचे प्रमुख शिल्पकार म्हणून जगभर ओळखले जाते. मूळचे कर्नाटकातील असलेले आणि २ जून १९५५ रोजी बेंगळुरू येथे जन्मलेले निलेकणी यांनी आयआयटी बॉम्बेमधून (IIT Bombay) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली आहे. वर्ष १९८१ मध्ये एन. नारायण मूर्ती यांच्यासह इन्फोसिसची पायाभरणी करणाऱ्या मोजक्या सह-संस्थापकांमध्ये त्यांचा समावेश होता. पुढे २००२ ते २००७ या काळात त्यांनी इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि व्यवस्थापकीय संचालक (MD) म्हणून कंपनीचे नेतृत्व केले, तर २०१७ मध्ये त्यांनी कंपनीचे नॉन-एक्झिक्युटिव्ह चेअरमन म्हणूनही महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. आता त्यांच्या या अफाट अनुभवाचा आणि तंत्रज्ञानविषयक कौशल्याचा फायदा देशातील परीक्षा प्रणाली सुधारण्यासाठी होणार असून, नवीन टास्क फोर्सच्या माध्यमातून परीक्षा पद्धतीतील अनागोंदी कारभार संपवून ती पूर्णपणे डिजिटल आणि सुरक्षित केली जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
