महत्त्वाच्या बातम्या

फत्यापूरच्या प्रणव घाडगे यांची मर्चंट नेव्हीमध्ये इंजिन कॅडेटपदी निवड

सातारा : सातारा जिल्ह्यातील फत्यापूर या छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबातील प्रणव सुखदेव घाडगे यांनी जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर मर्चंट नेव्हीमध्ये इंजिन कॅडेट म्हणून यश मिळवले आहे. त्यांच्या या निवडीमुळे घाडगे कुटुंबासह संपूर्ण फत्यापूर गावात आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

प्रणव यांचे प्राथमिक शिक्षण फत्यापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले, तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण कोरेगाव येथील डी. पी. भोसले विद्यालयात पूर्ण झाले. लहानपणापासूनच शिपिंग क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न त्यांनी मनाशी बाळगले होते. हे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी या क्षेत्रात कार्यरत असलेल्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेत सातत्याने मेहनत घेतली.

प्रणव यांनी आपल्या करिअरची इच्छा कुटुंबीयांसमोर व्यक्त केली तेव्हा सुरुवातीला काहीसा विरोध होईल, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, त्यांच्या जिद्दीवर विश्वास ठेवत आई-वडिलांनी त्यांना पूर्ण पाठिंबा दिला. नोकरीनिमित्त आई-वडील बाहेरगावी राहत असल्याने प्रणव यांनी आपल्या भावंडांसोबत शेतीची जबाबदारी सांभाळत अभ्यासही सुरू ठेवला. शेती आणि शिक्षण यांचा समतोल साधत त्यांनी सर्व आवश्यक परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केल्या आणि सीडीसी (Continuous Discharge Certificate) प्रमाणपत्रही प्राप्त केले.

या सातत्यपूर्ण परिश्रमाचे फळ म्हणून त्यांची मर्चंट नेव्हीमध्ये इंजिन कॅडेट म्हणून निवड झाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांचे हे यश प्रेरणादायी ठरत असून इच्छाशक्ती, कठोर परिश्रम आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते, हे प्रणव यांनी सिद्ध करून दाखवले आहे.

प्रणव घाडगे यांच्या या यशामुळे त्यांच्या कुटुंबासह संपूर्ण फत्यापूर गावाचा अभिमान उंचावला आहे. भविष्यात त्यांनी मर्चंट नेव्ही क्षेत्रात आणखी मोठे यश संपादन करून गाव, जिल्हा आणि राज्याचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहेत.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!