महत्त्वाच्या बातम्या

हा माझ्यासाठी अविस्मरणीय दिवस, माझ्या कपाळी इथली माती लागली – छत्रपती संभाजीराजे

जळगाव जामोद : खऱ्या शेतकऱ्याला आमदार बनवायची ऐतिहासिक संधी जळगाव जामोद वासीयांना आज आलेली आहे. दुसऱ्यांच्या शेतात राबणारी आई आणि शिलाई मशीन चालवून घराला हातभार लावणारी पत्नी लाभलेले प्रशांत डिक्कर हे सच्चे भूमिपुत्र असून त्यांना आमदार म्हणून विधानसभेत पाठवणे हा इथल्या नागरिकांच्या हक्काच्या लढाईच्या विजय असेल असे प्रतिपादन आज येथे  संभाजीराजे छ्त्रपती यांनी केले. 

स्वराज्य पक्षाचे जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांच्या प्रचारासाठी संभाजीराजे छत्रपती यांची जाहीर सभा आज येथे संध्याकाळी उशिरा झाली. या सभेत, या भागातील शेतकऱ्यांच्या आणि शेतमजुरांच्या समस्यांचा ऊहापोह करताना चार वेळा आमदार झालेल्या विरुद्ध उमेदवारांच्या अकार्यक्षमतेवर राजेंनी चांगलेच कोरडे ओढले. 

संभाजीराजे म्हणाले की, राजकारण गलिच्छ पातळीवर घसरलेलं असताना आज या गावात जे प्रेम, जो उत्साह आणि जी निर्मल ऊर्जा बघायला मिळाली तशी फार कमी वेळा बघायला मिळते. एका शेतमजूराचा मुलगा जो गेली अनेक वर्षे शेतकऱ्यांसाठी काम करतोय, त्याच्या सोबतीने इथली माती आम्ही कपाळी लावली हा मोठं भाग्याचा दिवस! कारण ही लढाई विस्थापित विरुद्ध सत्ताधारी प्रस्थापित अशी आहे. आणि शिवछत्रपतींचा वारसा मी सांगताना शेतकरी आणि रयतेच्या बाजूने पूर्ण शक्ति लावणं हे माझं कर्तव्यच आहे. त्याचवेळी या भागातील कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासाचीही संभाजीराजेंनी चर्चा केली. इतकं उत्पादन असूनही या भागात एकही प्रोसेसिंग युनिट का नाही असं करडा सवाल राजेंनी केला. शेतीशिवाय कुठलाही रोजगार नसल्याची खंत व्यक्त करताना राजे म्हणाले की प्रशांत डिक्कर आमदार होताच इथल्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लावणारच. 

संभाजीराजे पुढे म्हणाले की, गरिबांचे स्वप्न साकार करण्यासाठी शिवछत्रपती आणि राजर्षि शाहू महाराजांच्या घराण्याचे वंशज आम्ही असलो तरी इथली रयत आणि हा शेतकरी खरा राजा आणि त्याची उन्नती व्हावी, प्रगती व्हावी म्हणून स्वराज्य पक्ष आज राजकारणात उतरलेला आहे. त्यामुळे सप्तकिरणांसह निब या निवडणूक चिन्हावर शिक्का मारून प्रशांत डिक्कर यांच्यासारख्या शेतकऱ्याला विजयी करण्याचे आवाहन संभाजी राजे यांनी याठिकाणी केले. 
या प्रसंगी यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी आणि विशाल जनसमुदाय उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!