महत्त्वाच्या बातम्या

चिरमुर्यांच्या पोत्यांआड लपवून गुटख्याची वाहतूक; साताऱ्यात २५.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त

सातारा: महाराष्ट्र राज्यात विक्री व वाहतुकीस सक्त बंदी असलेला प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला एका ट्रकच्या माध्यमातून  सांगली बाजुकडून पुणे कडे तस्करी करणाऱ्या टोळीवर सातारा स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. नागठाणे (ता. सातारा) येथे सापळा रचून पोलिसांनी चिरमुरेच्या पोत्यांच्या आड लपवून नेण्यात येणारा तब्बल १७ लाख ६५ हजार ९४० रुपयांचा गुटखा आणि ७ लाखांचे वाहन असा एकूण २५ लाख १५ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, सांगलीकडून पुण्याकडे जाणाऱ्या एका मालट्रकमध्ये (क्र. MH 10/Z 4696) बंदी असलेला गुटखा मोठ्या चलाखीने वाहतूक केला जात असल्याची माहिती सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे यांच्या पथकाने ३ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास नागठाणे येथील हायवे ब्रीजजवळ सापळा रचून संबंधित संशयित ट्रक ताब्यात घेतला.

ट्रकची झडती घेतली असता, सुरुवातीला वरच्या बाजूला चिरमुरेची पोती रचण्यात आली होती. मात्र, त्या पोत्यांच्या आड अतिशय चलाखीने विमल पानमसाला आणि तंबाखूचे साठे लपवून ठेवल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी तात्काळ अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती रुपाली आप्पासाहेब खापणे यांना बोलावून घेत त्यांच्या उपस्थितीत संपूर्ण माल जप्त केला.

याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात अन्न व सुरक्षा मानदे कायदा २००६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सपोनि रोहित फार्णे, प्रशांत हुले आणि त्यांच्या पथकातील अधिकाऱ्यांनी व अंमलदारांनी ही धडाकेबाज कामगिरी पार पाडली आहे. अवैध धंद्यांवर सातारा पोलिसांच्या या कारवाईमुळे तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!