महत्त्वाच्या बातम्या

महापौर बंगल्याच्या टेंडरवरून राजकारण तापले; तावडे-पेडणेकरांमध्ये आरोप-प्रत्यारोप

मुंबई: मुंबईच्या महापौर बंगल्याच्या कामासाठी काढण्यात आलेल्या २ कोटी ८९ लाखांच्या वादग्रस्त टेंडरवरून राजकारण चांगलेच तापले आहे. वाढत्या वादानंतर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत हे टेंडर मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. हे काम प्रत्यक्षात राणीच्या बागेचे (Zoo) होते, मात्र टेंडरच्या शीर्षकात ‘हेरिटेज बंगलो‘ असा उल्लेख चुकून आल्यामुळे आणि त्यात महापौर बंगल्याचे नाव जोडल्यामुळे हा सर्व गैरसमज व वाद निर्माण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या संपूर्ण प्रकरणात विरोधकांकडून जाणीवपूर्वक फेक नरेटिव्ह पसरवला जात असल्याचा आरोप रितू तावडे यांनी केला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना महापौर रितू तावडे म्हणाल्या की, “हे संपूर्ण काम राणीच्या बागेचे होते, परंतु त्यामध्ये महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख झाला. या चुकीच्या शीर्षकामुळे हे काम महापौर बंगल्याचे की राणीच्या बागेचे, याबाबत संभ्रम निर्माण झाला आणि विरोधकांना आयता मुद्दा मिळाला. टेंडरवर ‘अपग्रेडेशन ऑफ हेरिटेज बंगलो‘ असे शीर्षक लिहिल्यामुळे हा वाद झाला. प्रत्यक्षात २ कोटी ८९ लाखांचे हे टेंडर राणी बाग उद्यान विभागाकडून काढण्यात आले होते, त्याचा हेरिटेज विभागाशी किंवा महापौर बंगल्याशी कोणताही संबंध नाही. केवळ ‘महापौर‘ हे नाव जोडले की राजकीय माइलेज मिळते, म्हणूनच उबाठा (UBT) पक्ष आपली दुकाने चालवण्यासाठी असा फेक नरेटिव्ह पसरवत आहे.” गेल्या २५ वर्षांतील त्यांचा घोटाळा लपवण्यासाठीच हे सर्व सुरू असल्याचा घणाघातही त्यांनी केला. विरोधकांकडे आता कुठलेही ठोस मुद्दे उरलेले नाहीत, असे सांगत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला. आदित्य ठाकरे यांनी कोणतीही खात्री न करता आणि अभ्यास न करताच सोशल मीडियावर ट्विट केले, अशी टीका त्यांनी केली.

महापौरांच्या या स्पष्टीकरणानंतर शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी रितू तावडे यांच्यावर अत्यंत कडक शब्दांत हल्लाबोल केला आहे. पेडणेकर म्हणाल्या की, “टेंडर आम्हीही वाचले आहे, त्यावर स्पष्टपणे ‘हेरिटेज बंगलो‘ असेच लिहिलेले आहे. जर अधिकाऱ्यांनी इतकी मोठी चूक केली असेल, तर ते अधिकाऱ्यांचे अपयश आहे. अधिकाऱ्यांच्या अशा चुकीमुळे महापौरांना नेहमी अडचणीत कोण आणत आहे? महापौर बंगल्याच्या जवळ बॅरिकेड्स लावण्या बाबतही संभ्रम आहे. आता टेंडर रद्द करण्याचा निर्णय घेतल्यावर तुमची खरी बालबुद्धी दिसून येते,” असे म्हणत पेडणेकरांनी महापौरांच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे मुंबई महानगर पालिकेच्या वर्तुळात आणि राजकीय पातळीवर जोरदार खळबळ उडाली असून, सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!