महत्त्वाच्या बातम्या

अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या सुषमा स्वराज यांना अभिवादन; ‘अग्निशिखा’ पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई: भारतीय राजकारणातील एक अष्टपैलू, प्रतिभावंत व्यक्तिमत्त्व, अमोघ वक्ता आणि देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांच्या जीवन कार्यावर आधारित ‘अग्निशिखा सुषमा स्वराज’ या हिंदी अनुवादित पुस्तकाची पहिली प्रत नुकतीच महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांना सस्नेह भेट देण्यात आली. डॉ. मेधा सोमय्या यांनी मूळ मराठी भाषेत लिहिलेल्या या पुस्तकाचा हिंदी अनुवाद प्रसिद्ध लेखक अमरजीत मिश्र यांनी केला आहे. राज्यपाल भवन येथे पार पडलेल्या या विशेष कार्यक्रमात राज्यपाल वर्मा यांनी सुषमा स्वराज यांच्या गौरवशाली राजकीय प्रवासाला आणि आठवणींना उजाळा दिला.

        सुषमा स्वराज यांच्या कार्याचा गौरव करताना राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले की, त्या केवळ एक प्रतिभावंत राजकारणीच नव्हत्या, तर आपल्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत त्यांनी ज्या-ज्या पदांची धुरा सांभाळली, त्या प्रत्येक पदावर आपल्या कर्तृत्वाचा एक वेगळा व अनोखा ठसा उमटविला होता. त्या एक अमोघ वक्ता, उत्कृष्ट संसदपटू, लढवय्या विरोधी पक्षनेत्या आणि अत्यंत कार्यक्षम मंत्री म्हणून संपूर्ण देशास परिचित होत्या. आजच्या आधुनिक समाजात तरुण पिढीला त्यांच्यासारख्या समकालीन आदर्श व्यक्तिमत्त्वाची (रोल मॉडेलची) नितांत आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

     यावेळी सुषमा स्वराज यांच्या संस्कृत भाषेवरील प्रभुत्वाचा विशेष उल्लेख करताना राज्यपाल म्हणाले की, स्वराज यांनी संस्कृत भाषेत दिलेले एक भाषण इतके अस्खलित आणि विद्वत्ताप्रचुर होते की, देशातील प्रत्येक संस्कृत विद्यार्थ्याने ते ऐकलेच पाहिजे. विद्यापीठांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमा साठी किंवा मार्गदर्शनासाठी सुषमा स्वराज यांचे ते भाषण उपलब्ध करून द्यावे, अशी शिफारस आपण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

     उत्तर पूर्वेकडील राज्यांच्या आठवणींना उजाळा देताना राज्यपाल म्हणाले की, त्याकाळी उत्तर पूर्वेकडील राज्यांमध्ये पक्षसंघटन काहीसे कमजोर असतानाही, सुषमाजी कार्यकर्त्यांच्या आग्रही निमंत्रणावरून आवर्जून त्या राज्यांचा दौरा करायच्या. विशेष म्हणजे, कोणत्याही जाहीर सभेत किंवा भाषणाला जाण्यापूर्वी त्या तिथल्या स्थानिक भाषेतील काही मूळ शब्द आणि वाक्ये आवर्जून समजून घ्यायच्या आणि आपल्या भाषणात त्यांचा वापर करायच्या. त्यांच्या या संवेदनशील आणि आदरयुक्त स्वभावामुळे त्या उत्तर पूर्वेकडील राज्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय नेत्या बनल्या होत्या. कार्यक्रमा दरम्यान पुस्तकाच्या लेखिका डॉ. मेधा सोमैया आणि अनुवादक अमरजीत मिश्र यांनी आपले मनोगत व्यक्त करत पुस्तकामागची भूमिका स्पष्ट केली.

   या महत्त्वपूर्ण पुस्तक भेट सोहळ्या प्रसंगी माजी केंद्रीय मंत्री डॉ. किरीट सोमय्या, नगरसेवक डॉ. नील सोमय्या, मुंबईचे माजी उपमहापौर अरुण देव यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!