महत्त्वाच्या बातम्या

चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील समस्या तातडीने सोडवा; शिंदेंचे निर्देश

मुंबई: महाराष्ट्र हे देशाचे प्रमुख औद्योगिक इंजिन असून, या इंजिनला अधिक गती देण्यासाठी चाकण आणि तळेगाव सारख्या महत्त्वाच्या औद्योगिक पट्ट्यातील उद्योगांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्याला राज्य शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. औद्योगिक क्षेत्रातील वाढती वाहतूक कोंडी रोखण्यासाठी आणि रस्त्यांच्या दुर्दशेवर मात करण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. पावसाळ्यात रस्ता दुरुस्ती करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेता, ठाणे-नाशिक मार्ग किंवा कशेडी बोगद्याप्रमाणे ‘प्री-कास्ट’ आणि ‘जिओ पॉलिमर टेक्नो पॅच’ यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून खड्डे बुजविण्याचे आणि रस्ते दुरुस्त करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

           चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या विविध अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आयोजित उच्चस्तरीय बैठकीत उपमुख्यमंत्री दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधत होते. या बैठकीस उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार डॉ. अमोल कोल्हे, विधान परिषद सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार बाबाजी काळे यांच्यासह उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. अन्बलगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पीएमआरडीएचे आयुक्त अभिजित चौधरी आणि विविध औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. औद्योगिक पट्ट्यातील पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी पुण्याचे जिल्हाधिकारी नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील आणि १४ विभागांचे अधिकारी त्यांच्या समन्वयाने काम करतील, असे स्पष्ट करत जिल्हाधिकाऱ्यांनी दर शुक्रवारी सर्व विभागांची बैठक घेऊन कामांना गती द्यावी, अशा सक्त सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.

         चाकण आणि तळेगाव परिसरातील उद्योगांना भेडसावणारे प्रश्न सोडवण्यासाठी कमी, मध्यम आणि दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यात येत आहेत. एमआयडीसीकडून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, नवीन पोलीस ठाणे, अग्निशमन केंद्र आणि विद्युत उपकेंद्रांसाठी तातडीने जागा उपलब्ध करून देण्यात येणार असून, गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला चाकण शहराचा विकास आराखडा तात्काळ मंजूर करण्यात येईल, अशी महत्त्वाची घोषणाही या वेळी करण्यात आली. वीजेची समस्या दूर करण्यासाठी महापारेषणकडून आगामी ३१ ऑगस्टपर्यंत नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे नियोजन करण्यात आले असून, रस्त्यांच्या कामात कोणत्याही प्रकारची टाळाटाळ किंवा दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. चाकण परिसरातील मलनिस्सारण, घनकचरा, पाणी, रस्ते आणि वीज यांसारख्या एकमेकांशी जोडलेल्या सुविधांचा सर्वसमावेशक आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

        छत्रपती संभाजीनगर, रांजणगाव आणि चाकण एमआयडीसीला जोडणारा ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर’ तसेच नवीन महामार्गांमुळे या संपूर्ण परिसरातील औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळून वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला असून, उद्योगांना दर्जेदार पायाभूत सुविधा देऊन राज्य नेहमीच अग्रेसर ठेवण्याची शासनाची कटिबद्धता असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!