महत्त्वाच्या बातम्या

गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्याचे निर्देश

मुंबई: महाराष्ट्राचा लाडका आणि सांस्कृतिक अस्मितेचा सोहळा असलेला गणेशोत्सव यंदा अधिक व्यापक, पर्यावरण पूरक आणि जागतिक पातळीवर पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा केला जाणार आहे. या महोत्सवात राज्यातील सर्व मंत्रालयीन विभागांनी त्यांच्या अधिनस्त कार्यालये व महा मंडळांच्या माध्यमातून सक्रिय सहभाग घ्यावा, असे स्पष्ट निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले आहेत. गावांपासून ते थेट जागतिक स्तरापर्यंत या उत्सवाचा विस्तार करतानाच, या ऐतिहासिक महोत्सवाला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर विशेष नियोजन करण्यात आले आहे.

         या राज्य महोत्सवांतर्गत राज्यातील तब्बल ४८० उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर मिळून सुमारे दीड कोटी रुपयांची भरगोस पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय, राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांसह देशातील इतर १० राज्ये आणि भारता बाहेरील एका देशातही विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. राजधानी नवी दिल्लीत सलग पाच दिवस, तर मुंबईत आठ दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी धूम पाहायला मिळणार आहे. भाविकांसाठी प्रमुख गणेश मंदिरे व सार्वजनिक उत्सवांचे ऑनलाइन दर्शन घडविणारे स्वतंत्र पोर्टल विकसित केले जात असून, घरगुती गणेशोत्सवाची छायाचित्रे सामायिक करण्यासाठी एक विशेष डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत आहे.

पर्यावरणपूरक उत्सव आणि महिला बचत गटांना प्रोत्साहन

यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरण पूरक उपक्रमांवर भर दिला जाणार असून, शाडू मातीच्या मूर्तींचा वापर, बीज गणपती, निर्माल्य संकलन व पुनर्वापर, प्लास्टिक मुक्त उत्सव आणि सौर ऊर्जेवर चालणारे मंडप उभारण्या बाबत राज्यभर जनजगृती मोहीम राबवली जाईल. तसेच, स्थानिक शेतकरी, महिला बचत गट आणि सहकारी संस्थांना मोदक, प्रसाद साहित्य व सेंद्रिय कृषी उत्पादनांच्या विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. युवकांसाठी शाडूच्या मूर्ती, मखर आणि डिजिटल डिझाइनवर आधारित उद्योजकता प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केल्या जाणार असून, शाळा व महाविद्यालयां मध्येही पर्यावरण आणि विज्ञानावर आधारित विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल.

आरोग्य, सुरक्षा आणि सर्वसमावेशकतेला प्राधान्य

उत्सवा दरम्यान भाविकांची सुरक्षितता आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे आणि हृदय विकाराच्या प्रसंगी उपयोगी पडणाऱ्या सीपीआर (CPR) प्रशिक्षणाला प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच, दिव्यांग भाविकांसाठी रॅम्प, व्हीलचेअर, सांकेतिक भाषेतील आरती आणि सुलभ प्रवेशाची विशेष व्यवस्था करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

     सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धेसाठी समित्या स्थापन करून प्रत्यक्ष पाहणी व गुणांकनाची प्रक्रिया पार पाडावी, तसेच गृह आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था आणि विसर्जन मार्गांचे चोख नियोजन करावे, असे सांगत हा गणेशोत्सव ऐतिहासिक आणि संस्मरणीय होईल, असा विश्वास सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!