महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात २०३२ च्या जागतिक सायकलिंग स्पर्धेसाठी तयारी

पुणे : पुण्यात आंतरराष्ट्रीय दर्जाची सायकलिंग स्पर्धा आयोजित करण्याच्या दिशेने राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. २०३२ ची यूसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप पुण्यात आयोजित करण्यासाठी सरकारने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पुण्याच्या क्रीडा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्थानाला नवी ओळख मिळण्याची शक्यता आहे.

      पुण्यात नुकत्याच झालेल्या ‘पुणे ग्रँड टूर २०२६’ या सायकलिंग स्पर्धेचे यशस्वी आयोजन झाल्याने पुण्याची दावेदारी अधिक मजबूत झाली आहे. जागतिक दर्जाची स्पर्धा आयोजित करण्यासाठी राज्य सरकारकडून आवश्यक पत्रव्यवहार, आर्थिक हमी तसेच रस्ते आणि अन्य पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य केले जाणार आहे.

     या स्पर्धेच्या माध्यमातून देश-विदेशातील नामांकित सायकलपटू, प्रशिक्षक, क्रीडा अधिकारी आणि प्रेक्षक मोठ्या संख्येने पुण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील हॉटेल व्यवसाय, वाहतूक, पर्यटन, खाद्यपदार्थ व्यवसाय आणि स्थानिक उद्योगांना मोठी चालना मिळू शकते.

     सरकारच्या अंदाजानुसार, या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमुळे पुण्यात सुमारे ३३० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे २०३२ ची ही स्पर्धा केवळ क्रीडा आयोजन न राहता पुण्याच्या पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ देणारा महत्त्वाचा उपक्रम ठरू शकतो.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!