महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील प्रसिद्ध ‘सुर्वेज ढाब्या’वर बाणेर पोलिसांची धडक कारवाई; अवैध मद्यसाठा जप्त, मालक आणि मॅनेजर अटकेत

पुणे: पुणे शहरातून एक मोठी बातमी समोर आली असून, पाषाण परिसरातील अत्यंत प्रसिद्ध असलेल्या ‘सुर्वेज ढाब्या‘वर बाणेर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या ढाब्यावर बेकायदेशीरपणे मद्यसाठा करून ग्राहकांना अमली किंवा बेकायदेशीर मद्य विक्री सुरू असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला. या धडक कारवाईत पोलिसांनी सुमारे ६१ हजार २२० रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त केला असून, या प्रकरणी हॉटेलचा मालक आणि मॅनेजर अशा दोन्ही मुख्य संशयितांना अटक करण्यात आली आहे.

       पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार, बाणेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त आणि अवैध धंद्यांविरोधातील मोहीम सुरू असताना सहायक पोलीस निरीक्षक बालाजी सानप यांना एका गुप्त बातमी दाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली. सुतारवाडी-पाषाण येथील मुंबई-बेंगळुरू महामार्गाच्या सर्व्हिस रोड लगत असलेल्या सुप्रसिद्ध ‘सुर्वेज ढाब्यावर‘ (Surve’s Pure Non-veg, Sutarwadi) विनापरवाना व बेकायदेशीररीत्या मद्यविक्री सुरू असल्याचे या माहितीवरून स्पष्ट झाले.

       ही माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक सानप यांनी तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांना याची कल्पना दिली. वरिष्ठांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तत्काळ संबंधित ठिकाणी छापा टाकला. ढाब्याच्या आतील भागात झडती घेतली असता, तिथे लपवून ठेवलेला दारू आणि बिअरच्या बाटल्यांचा मोठा अवैध साठा पोलिसांच्या हाती लागला. याप्रकरणी पोलिसांनी हॉटेल मॅनेजर गोपाल श्रीकृष्ण निचळ (वय ४५, रा. भुगाव, पुणे) याला घटना स्थळावरून ताब्यात घेतले.

        तपासा दरम्यान मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे हॉटेल मॅनेजर गोपाल निचळ याच्यासह हॉटेल मालक कुणाल सुधाकर गायकवाड (वय ३९, रा. पिंपळे गुरव, पुणे) यांच्यावरही कायदेशीर गुन्हा दाखल करत दोघांना अटक करण्यात आली आहे. ही यशस्वी कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त चुलूमुला रजनीकांत आणि सहायक पोलीस आयुक्त ब्रम्हदेव गावडे यांच्या मार्गदर्शनपर सुचने नुसार पार पडली. बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, गुन्हे निरीक्षक विजय खिल्लारे, सहायक पोलीस निरीक्षक बालाजी सानप तसेच पोलीस अंमलदार सौरभ पाटील आणि गणेश मुंढे यांच्या पथकाने ही कारवाई केली असून, पुणे परिसरातील अवैध धंद्यांवर कडक पाळत ठेवण्यात आली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!