महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत भीषण अपघात; स्विफ्ट-इनोव्हा धडकेत दोन आमदारांसह ६ जण जखमी

दिल्ली: देशाची राजधानी दिल्लीतून एक मोठी आणि खळबळ जनक दुर्घटना समोर आली आहे. रविवारी रात्री साडे-नऊच्या सुमारास दिल्लीतील अति संवेदनशील आणि वर्दळीच्या आयटीओ (ITO) परिसरातील पीडब्ल्यूडी (PWD) कार्यालया समोर एका भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव असलेली एक स्विफ्ट कार रस्ता दुभाजक आणि लोखंडी रेलिंग ओलांडून थेट विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये गेली आणि समोरून येणाऱ्या इनोव्हा कारवर जाऊन जोरदार आदळली. या भीषण अपघातात आम आदमी पक्षाचे (AAP) किराडी मतदारसंघाचे विद्यमान आमदार अनिल झा आणि कर्नाटकातील भारतीय जनता पक्षाचे (BJP) आमदार अभय पाटील यांच्यासह एकूण सहा जण जखमी झाले आहेत.

     प्राप्त माहिती नुसार, लक्ष्मी नगरकडून आयटीओच्या दिशेने एक स्विफ्ट कार जात होती. या दरम्यान चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ती अचानक रस्ता दुभाजक ओलांडून पलीकडच्या मार्गावर धडकली आणि समोरून येणाऱ्या इनोव्हा कारशी समोरा समोर भिडली. या इनोव्हा कारमधून आपचे आमदार अनिल झा आणि कर्नाटकचे आमदार अभय पाटील प्रवास करत होते. दुसरीकडे, स्विफ्ट कारमध्ये ३२ वर्षीय आशुतोष पांडे हे आपल्या पत्नी आणि दोन लहान मुलांसह प्रवास करत होते. या जोरदार धडकेमुळे दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले असून प्रवाशांना दुखापत झाली.

     अपघाताची माहिती मिळताच आयपी इस्टेट पोलीस ठाण्याचे पथक आणि दिल्ली पोलिसांचे गुन्हे अन्वेषण पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी युद्ध पातळीवर मदतकार्य करत सर्व सहाही जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या लोकनायक जयप्रकाश (LNJP) रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या मते, सर्व जखमींची प्रकृती स्थिर असून त्यांना किरकोळ ते मध्यम स्वरूपाची दुखापत झाली आहे. दिल्ली पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, रात्री उशिरा पर्यंत घटना स्थळावरील वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू होते.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!